नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चैतन्याचा झगमगाट घेऊन येणाऱ्या नवरात्रोत्सवाची प्रकाश किरणे यंदा भक्कम तटबंदी असलेल्या मध्यवर्ती कारागृहालाही प्रकाशमान करणार आहेत. होय, यावेळी कारागृहातही माता दुर्गेची आराधना केली जाणार असून, तशी तयारीही आतमध्ये सुरू झाली आहे.
शक्ती - भक्ती - समर्पण आणि चैतन्याचा अनोखा मेळ साधणारे पर्व म्हणजे नवरात्र. देवी दुुर्गेच्या आराधनेच्या या पावन पर्वात लहान-मोठे, जाती-पातीच्या भिंती तोडून एकत्र येतात अन् सळसळत्या उत्साहाचा प्रत्यय देत आनंदाची उधळण करतात. देशातील विविध प्रांतांत नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गाव-गाव आणि शहरा-शहरात मोठ्या जल्लोषात माताराणी दुर्गेची भक्ती-भावाने पूजा-अर्चा केली जाते. नवरात्रीच्या नऊही दिवसांत रास गरबा-दांडिया तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. मात्र, या जल्लोषापासून मोठ्या शहरातील एक वसाहत दूर असते. ती वसाहत म्हणजे, कारागृह. गुन्हेगारांची वसाहत समजल्या जाणाऱ्या कारागृहाच्या भेसूर भिंतीआड डांबण्यात आलेले अनेक जण सणोत्सवापासून दूर असतात. मात्र, यंदा कारागृहातही महिषासुरमर्दिनीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बंदीवानांचा पुढाकार आणि कारागृह प्रशासनाच्या साथीने त्याची तयारी आतमध्ये सुरू आहे. रविवारी घटस्थापना केली जाणार आहे. त्यानंतर रोज सकाळ, सायंकाळी भक्तिभावाने पूजा-अर्चा, आरती आणि भजनाचे कार्यक्रम होतील. अनेक कैद्यांकडून नवरात्रीत उपवासही ठेवला जाणार आहे.
कॅन्टीनमधून मिळणार उपवासाचे पदार्थ
जे बंदीवान नवरात्रीचे उपवास करतात, अशांना कारागृहातील कॅन्टीनमधून दूध, ज्यूस, केळी तसेच अन्य फळे, आणि उपवासाचा चिवडा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे शहरा-शहरात भव्य दिव्यतेची झालर लावून प्रचंड उत्साहात साजरा केला जाणारा नवरात्री उत्सव तेवढ्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने कारागृहातही साजरा केला जाणार आहे.
सर्वच सण साजरे
कारागृहातील बंदीवान वेगळ्याच मूडमध्ये असतात. त्यामुळे त्यांना तणावमुक्त करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणि महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, पोळा, आषाढी एकादशी, ईद, मोहरम, असे सर्वच मोठे सण आम्ही साजरे करतो. नवरात्रोत्सवही साजरा केला जाणार आहे, अशी माहिती या संबंधाने बोलताना कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी लोकमतला दिली.