लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यापासून शांत झालेल्या बॅण्ड, धुमाल पार्टी, संदल आणि डीजेचा आवाज आता पुन्हा घुमू लागणार आहे. लग्न किंवा सार्वजनिक उत्सवात लोक फेटे बांधून सजणार आणि घोडे-बग्गीवर बसून मिरवूही शकणार आहेत. होय, आठ महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांना ‘बजावो रे...’ ची परवानगी दिली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक आणि हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात ६५ नाेंदणीकृत बॅण्डपथक आहेत तर शेकड्यावर लहानमाेठे बॅण्ड व्यावसायिक आहेत. यामध्ये काम करणारे हजाराे कलाकार आहेत. याशिवाय संदल व धुमाल पार्टी तसेच शेकड्यावर डीजे वाजविणारेही आहेत. लग्नकार्य असाे की धार्मिक, सामाजिक उत्सवाचा क्षण, आपल्या कलेने व मेहनतीने हे वाजंत्री लाेकांना आनंद देत असतात. याशिवाय घाेडेवाले, बग्गीवाले, फेटेवाले, लायटिंग आदींचाही व्यवसाय यांच्यासाेबत जुळलेला आहे. काेराेनामुळे या सर्वांचे काम ठप्प पडले. लग्नसराई वाया गेली आणि गणेशाेत्सव, दुर्गाेत्सवही खालीच गेला. गेल्या आठ महिन्यापासून राेजगार बंद असल्याने व्यवसायावर अवकळा आणि काम करणाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली.
अनलाॅकनंतर आधी २० व नंतर ५० लाेकांच्या उपस्थितीसह लग्नकार्याला परवानगी मिळाली पण वाजंत्र्यांना नाही. यादरम्यान वर्धा, अमरावती, साेलापूर आदी शहरात परवानगी मिळाल्याने नागपूर शहरातील व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता हाेती. त्यामुळे या क्षेत्रातील लाेकांनी राज्याचे गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह पाेलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन व्यवसायास परवानगी देण्याची विनंती केली. या प्रयत्नात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहर सचिव घनश्याम निखाडे यांच्यासह आशिष पांढरे, शशांक गिरडे, उमेश उतखेडे, पिंटू बिसेन, प्रकाश साेनटक्के, राहुल वंजारी, पवन शाहू तसेच बॅण्ड असाेसिएशनचे श्रीधर सनेश्वर, घाेडा असाेसिएशनचे बंटी महाजन, अतुल ढगे, असलम घाेडेवाले आदींनी कलावंतांसाठी प्रयत्न केले. अखेर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी आदेश काढून घाेडे, बग्गी, फेटेवाले यांच्यासह बॅण्ड, संदल, धुमाल, डीजे वाजविण्यास परवानगी देत माेठा दिलासा दिला.