लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनगर, बजाजनगर हा भाग शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखण्यात येतो. या भागात सकाळी व सायंकाळी ‘वॉक’ला जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र बजाजनगर चौक ते आठरस्ता चौक या मार्गाला लागलेल्या अतिक्रमणाच्या ग्रहणामुळे या रस्त्यावरून सायंकाळी तर चालणेदेखील कठीण झाले आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी तर फूटपाथ शोधूनही सापडत नाही. मोठमोठी हॉटेल्स, आस्थापना, दुकानदार यांनी एकतर फूटपाथ गिळंकृत केले आहेत किंवा त्यांच्या ‘पार्किंग’ची ती हक्काची जागाच झाली आहे. फूटपाथवर वाहनांची ‘पार्किंग’ असताना नागरिकांनी सुरक्षितपणे चालावे तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहने चालविण्यासाठी प्रचंड अडचण होत असून, ज्येष्ठ नागरिक तर जीव मुठीत घेऊनच चालताना दिसून येतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फूटपाथ तर आहेत, मात्र त्यांच्यावर दुकानदार, फेरीवाले यांनी अक्षरश: कब्जा केलेला आहे. दिवसभर या रस्त्यावर वाहनांची अस्ताव्यस्त ‘पार्किंग’ असते आणि सर्रासपणे यासाठी फूटपाथचा वापर करण्यात येतो. यामुळे सायंकाळच्या सुमारास तर या रस्त्यावरील अनेक भागात वाहनांची कोंडी होते. प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.खाद्यपदार्थांच्या ठेल्यांचे अतिक्रमण लक्ष्मीनगर चौक ते बजाजनगर चौक या मार्गावर सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खाद्यपदार्थांचे ठेले लागतात. हे ठेले फूटपाथवर लागत असल्याने पादचाऱ्यांची प्रचंड अडचण होते. या ठेल्यांवर येणारे ग्राहक रस्त्यांवर वाहने ठेवतात. त्यामुळे सायंकाळी या रस्त्यावर प्रचंड गर्दी असते; शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही तरुणदेखील येथे फिरताना दिसून येतात. बजाजनगरच्या रस्त्यावर रहिवासी इमारतींमध्ये काही ‘कॅफे’ व खाद्यपदार्थांचे ‘स्टॉल्स’ उघडले आहेत. यांनी तर फूटपाथवर आपलाच हक्क सांगितला आहे. त्यांची दुकाने, ग्राहकांची बसण्याची व्यवस्था हे सर्व ‘फूटपाथ’वरच होत असते. या भागातील नागरिकांसाठी सायंकाळी येथून चालत जाणे हे एक आव्हानच असते.प्रशासन, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष येथील अतिक्रमणासंदर्भात येथील नागरिकांनी वारंवार मनपा प्रशासन तसेच वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र थातूरमातूर कारवाई करण्यात येते व परत राजरोसपणे अतिक्रमणाला सुरुवात होते. मनपातील अधिकारी व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील अतिक्रमण फोफावले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.लक्ष्मीनगर चौकाची रयाच हरविली शहरातील ‘पॉश’ भाग म्हणून लक्ष्मीनगरची गणना होत असली तरी, प्रत्यक्षात मुख्य चौकाची अवस्था अतिशय वाईट आहे. चौकात असलेल्या एका ‘रेस्टॉरंट’च्या खुर्च्या चक्क फूटपाथवर मांडून ठेवण्यात येतात, तर शेजारीच इमारतीच्या बांधकामाच्या साहित्यात फूटपाथ गडप झाले आहे. चौकातील ‘मिलेनियम शॉपिंग मॉल’मध्ये येणाºया वाहनांचे ‘पार्किंग’ चक्क फूटपाथवरच होते तर चौकाच्या एका कोपऱ्यात चहाचे ठेले व पानटपऱ्यांमुळे चालायलादेखील जागा शिल्लक राहिलेली नाही. सायंकाळच्या सुमारास तर येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी दिसायला मिळते.दुकानदारांचे असेही अतिक्रमणमुख्य रस्त्यावर असणाऱ्या अनेक दुकानदारांनी नियमबाह्य पद्धतीने बांधकाम केले आहे. काहींनी दुकानासमोर ‘शेड’ टाकले आहेत. येथील रेस्टॉरंट्स, इतर दुकाने येथे हेच चित्र आहे. बजाजनगर चौकात फूटपाथवरच कपडे विक्रीला लावण्यात आले आहेत. बजाजनगरच्या एका दुकानाची जाहिरात चक्क फूटपाथवर ठेवण्यात आली आहे तर एका राष्ट्रीयीकृत बँकेजवळ असलेल्या ‘व्हेज फाईन डाईन’मुळेदेखील फूटपाथ प्रभावित झाला आहे. बजाजनगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील एका मोठ्या ज्वेलरी शॉपसमोर ‘मॅट’ टाकण्यात आली असून, येथे ‘फूटपाथ’ शोधावा लागत आहे. याकडे मनपाच्या एकाही अधिकाऱ्याचे किंवा कर्मचाऱ्याचे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लक्ष्मीनगर येथील एका इमारतीसमोर तर फूटपाथवरच एका दुकानदाराने ‘साईनबोर्ड’ लावला आहे तर वाहनांची ‘पार्किंग’देखील फूटपाथवरच होत असल्याचे चित्र आहे.‘बसस्टॉप’जवळदेखील अतिक्रमणया मार्गावर तीन ठिकाणी ‘बसस्टॉप’ आहेत. बजाजनगरातील ‘बसस्टॉप’च्या शेजारीच खाद्यपदार्थांचे ठेले उभे राहतात. तर विरुद्ध दिशेला असणाऱ्या ‘बसस्टॉप’वर बाजूच्या हॉटेलमधील ग्राहकांची वाहने ‘पार्क’ असतात. आठरस्ता चौकाजवळील बसस्टॉपसमोर वाहनांची ‘पार्किंग’ असते.फेरीवाल्यांवर नियंत्रण कोण आणणार?या परिसरात फूलविक्रेते, फळवाले, भाजीविक्रेते जागोजागी दिसून येतात. रस्त्यांवरच ते आपला माल लावतात. बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौकाजवळील परिसरात चार ते पाच फूलविक्रेते बसतात. त्यांच्यामुळे पादचाऱ्यांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. याशिवाय लक्ष्मीनगरच्या हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या वळणाजवळ फूटपाथवरच पानठेले, फळ व भाजीविक्रेत्यांचे ठेले आहेत. वर्षानुवर्षे हे अतिक्रमण कायम असून, याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे.आठरस्ता चौकात वाहनांची रांगआठरस्ता चौकातच असलेल्या एका बँकेची सर्व वाहने फूटपाथवरच लावण्यात येतात; सोबतच येथून जवळच असलेल्या एका हॉटेलने तर फूटपाथच गिळंकृत केला आहे. येथे फूटपाथवर हॉटेलने झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. या मार्गावरील अनेक रहिवाशांची वाहनेदेखील फूटपाथवरच लावण्यात येतात. तर काही ‘कॅफे’, पार्लरतर्फेदेखील ग्राहकांना फूटपाथवरच वाहने लावण्यास सांगण्यात येते, अशी नागरिकांनी तक्रार केली आहे.