नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळा नागपुरात मोठ्या उत्साह पार पडला. नागपूरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आज सायंकाळी सहा वाजता सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या सोहळ्यात मंचावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, प्रसिद्ध विधिज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा उपस्थित होते.
लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविक केले. निष्पक्ष व निर्भिड पत्रकारिता लोकमतने केलेली आहे. ब्रिटीशांशी लढण्याचे व्रत लोकमतने जपले आणि स्वातंत्र्यानंतर विकासाची वाट चोखाळून लोकमतने पुढे नेली. देशाच्या वाटचालीत मोठे योगदान देणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याचा संकल्प गेल्या दोन वर्षांपासून लोकमतने निष्ठेने पाळला आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात कामकाज करणा-या आमदारांची निवड तज्ज्ञ ज्यूरींनी केली आहे. विधीमंडळाचा दीर्घ अनुभव असलेल्या दोन मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे माझे जुने स्नेही आहेत. ते अत्यंत टेक्नोसॅव्ही व कमी बोलणारे व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. दुसरे सत्कारमूर्ती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आहेत. त्यांना आम्ही प्रेमाने नाना म्हणतो. ते वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहेत अशा शब्दात त्यांनी या दोन्ही मान्यवरांचा गौरव केला.
कार्यक्रमाची रंगत वाढवणारा लोकमत की अदालत हा कार्यक्रम ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या संचालनात सुरू करण्यात आला. आपल्या खुसखुशीत व बारीक चिमटे घेत सर्वांनाच हंसत ठेवण्याच्या शैलीने त्यांनी अदालतीचे प्रास्ताविक करून सर्वांच्या टाळ्या मिळवल्या. राजकारण आणि न्यायालयाची तुलनात्मक मांडणी करताना त्यांनी राजकारण्यांवर मिश्कील शरसंधान केले. आरोपीच्या पिंज-यात सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, जयंत पाटील आणि विखे पाटील यांना उभे करण्यात आले होते.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, त्या अधिकारांचं हनन कोणीही करू शकत नाही. दोन वर्षांच्या वर शिक्षा झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकारी नाही. भाजपामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नाहीत. तर, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले, पक्षांनी स्वतःवरच आचारसंहिता लादली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देऊ नये. याचबरोबर, गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ नये, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
या सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याचबरोबर, सुनील प्रभू यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार(विधानसभा), अनिल सोले यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानपरिषद), श्रीमती यशोमती ठाकूर यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा), श्रीमती विद्या चव्हाण यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानपरिषद), आशिष शेलार यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा) आणि संजय दत्त यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानपरिषद) म्हणून सन्मान करण्यात आला.
सरपंच पदापासून संसदेपर्यंत उत्तम कामगिरी करणा-या लोकप्रतिनिधींचा गौरव करण्याची प्रथा ‘लोकमत’ने सुरू केली आहे. या मालिकेतील विधिमंडळ पुरस्काराचे हे दुसरे पुष्प आहे.