नागपूर : कोरोना संक्रमण झालेल्यांना शहरातील रुग्णालयांमध्ये भरती करून घेण्यासाठी बेड उपलब्ध नसल्याने अनेकांचा घरीच जीव जात आहे. अशीच पुन्हा एक घटना मंगळवारी घडली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रदीप धोटे हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना १६ एप्रिल रोजी उपचारासाठी नागपुरात आणण्यात आले. १७ एप्रिल रोजी शहरातील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यासाठी नेण्यात आले. तेव्हा त्यांचा प्राणवायू ८७ व सीटी स्कोर २५ असल्याने त्यांना भरती करून घेतले नाही. त्यांना घरीच कृत्रिम प्राणवायूवर ठेवण्यात आले. पण, प्रकृती अत्यवस्थ होत असल्याने, घरच्यांनी बेड मिळण्यासाठी शहरातील बहुतांश रुग्णालयात संपर्क साधला. सोशल मीडियावर येणाऱ्या सर्व हेल्पलाईनवर संपर्क साधला. पण, कुणीही बेड उपलब्ध करून दिला नाही. दोन दिवस रुग्णालयांच्या चकरा मारल्यानंतरही उपचार न झाल्याने मंगळवारी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे घरचा जीव गेल्याचा संताप नातेवाइकांनी व्यक्त केला.