लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील ४० दिवसापासून नीरी मार्गावर पडून असलेले मातीचे ढिगारे अखेर हटले. ऐन वर्दळीच्या मार्गावर हे ढिगारे तसेच असल्याने एका दक्ष नागरिकाने या ढिगाऱ्यावरच वृक्षारोपण करण्याची तयारी दर्शविली होती. तसा लहान फलकही ढिगाऱ्यावर लावला होता. तेव्हा कुठे यंत्रणेला जाग आली.
नीरीची रस्त्यावर असलेल्या रस्ता दुभाजकामध्ये झाडे लावण्याची योजना आहे. त्या दुभाजकामध्ये टाकण्यासाठी म्हणून ही माती आणण्यात आली होती. मात्र हे ढिगारे तसेच रस्त्यावर ठेवण्यात आले. तब्बल ४० दिवस ते तसेच होते. कुणीही यासाठी पुढाकार घ्यायला तयार नव्हते. अखेर एका ‘कॉमन मॅन’ने शक्कल लाढविली. दोन दिवसापूर्वी या ढिगाऱ्यावरच एक फलक लावला व येत्या रविवारी वृक्षारोपण करायचे असल्याने उपस्थित राहण्याची विनंती त्यातून नागरिकांना केली. ही छायाचित्रे बुधवारी दिवसभर समाजमाध्यमांवरून फिरली. ‘लोकमत’नेही ठळकणे प्रकाशित केली. अखेर यंत्रणेला जाग आली आणि ढिगारे हटविण्यात आले.