नागपूर : शासकीय रुग्णालयाचा कणा असलेल्या राज्यभरातील परिचारिकांनी आपल्या मागण्या रेटून धरत संपाचे हत्यार उपसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती. शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळताच दुपारी ४ वाजता संप मागे घेण्यात आला. अखेर परिचारिका रुग्णसेवेत रुजू झाल्याने रुग्णालय प्रशासनासह रुग्णांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
पदभरती, पदोन्नती, कोविडभत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांनी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने २१ जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पहिले दोन दिवस दोन तासांचे, नंतरचे दोन दिवस पूर्ण दिवस कामबंद आंदोलन केले. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाशी होत असलेल्या चर्चेतून तोडगा न निघाल्याने शुक्रवारपासून परिचारिका बेमुदत संपावर गेल्या. यामुळे रुग्णालये अडचणीत आली. नागपूरमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील जवळपास ८०, मेयोमधील १५० तर मेडिकलमधील ८०० परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या. मेडिकलमध्ये आरोग्य विभागातील परिचारिका व नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदतही घेण्यात आली नव्हती. यामुळे २० वॉर्डात परिचारिकाच नव्हत्या. त्यांचा कामाचा भार निवासी डॉक्टरांवर आला होता. परंतु आज दुपारनंतर संप मागे घेताच रुग्णालयातील रुग्णसेवा पुन्हा रुळावर आली.
-मागणीतून जुनी पेन्शन योजना वगळली
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख शुक्रवारी लातूर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी भेटून चर्चा केली. त्यांनी प्रलंबित मागण्यांमधून जुनी पेन्शन योजना वगळून इतर सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यावर विचार करीत संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुपारी ४ वाजता संपात सहभागी असलेल्या परिचारिका आपल्या कामावरही परतल्या.
-शहजाद बाबा खान, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना