नागपूर विद्यापीठ : पदभरतीसाठी मार्ग मोकळा नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याअंतर्गत दोन अधीक्षकांना सहायक कुलसचिवपदी बढती देण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या इतर पदोन्नतीदेखील या पंधरवड्यात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे मनुष्यबळात वाढ होईल, अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे. नागपूर विद्यापीठातील अनेक कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून पदोन्नतीची प्रतीक्षा होती. यातील काही जण तर आता निवृत्तीलादेखील आले आहेत. याबाबत कर्मचारी संघटनांकडूनदेखील वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. अखेर मंगळवारी यासंदर्भात समितीची बैठक झाली व त्यात पदोन्नतीचा निर्णय घेण्यात आला. यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत असलेले बिंदूप्रसाद शुक्ला व गजेंद्र कुकडे यांना सहायक कुलसचिवपदी बढती देण्यात आली आहे. चार वरिष्ठ लिपिकांची अधीक्षक म्हणून बढती झाली आहे. याशिवाय लवकरच कनिष्ठ लिपिकांनादेखील पदोन्नती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे मागील महिन्यात विद्यापीठातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील १९ कर्मचारी निवृत्त झाले. शिवाय सहायक कुलसचिव, उपकुलसचिवांची पदेदेखील रिक्त आहेत. अशा स्थितीत कर्मचारी, अधिकाऱ्यांवरील ताण वाढण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मिळून ३०० हून अधिक पदे रिक्त आहेत. यापैकी ५० टक्के पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी शासनाकडून नव्या मान्यतेची गरज नसून केवळ कोणकोणती पदे भरत आहे, याची माहिती विद्यापीठ पाठविणार असल्याची माहिती डॉ.काणे यांनी दिली. पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आपल्यावरील कामाचा ताण कमी होईल, अशी आशा कर्मचारी व अधिकाऱ्यांना आहे. (प्रतिनिधी)
अखेर मिळाली कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By admin | Published: July 28, 2016 2:32 AM