लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली तरी निर्बंध कायम असल्यामुळे हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्याची माहिती दिली असून, त्यात निश्चितपणे नागपूरचा समावेश राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार सोडून इतर दिवशी निर्बंधांमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता असून, राज्य शासनाच्या अधिकृत घोषणेकडे व्यापारीवर्गासह जनसामान्यांचेदेखील लक्ष लागले आहे.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली होती व त्यानंतर बाधितांची संख्या कमी होऊ लागली. गुरुवारी पॉझिटिव्हिटीची टक्केवारी ०.१७ टक्के इतकीच होती. असे असले तरी नागपूरला लेव्हल-१ ऐवजी लेव्हल-३ च्या निर्बंधांचा सामना करावा लागतो आहे. याविरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलनाचादेखील पवित्रा घेतला. निर्बंध हटविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. निर्बंध शिथिल करण्याबाबत टास्क फोर्सशी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल पाठविण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात लेव्हल-१ चे निर्बंध राहतील. त्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत बाजार उघडे ठेवण्याची अट हटविली जाण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत बाजारपेठा खुल्या राहू शकतील. सोबतच रेस्टॉरंटमध्येदेखील डाइन-इनबाबत वेळेची मर्यादा वाढविण्यात येऊ शकते. यासंदर्भात राज्य शासनाकडून अद्याप काहीच निर्देश आलेले नाहीत. शासनाच्या निर्देशांनुसार पुढील पावले उचलण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिली.
धार्मिक स्थळांना परवानगी मिळणार का
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेव्हल-१ चे निर्बंध लावल्यावर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे उघडण्याला परवानगी दिली जाऊ शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता याबाबत शासनालाच अंतिम निर्णय घ्यायचा आहे. सार्वजनिक स्थळेदेखील खुली करण्यात येतील. चित्रपटगृहे व मॉलदेखील काही अटींसह उघडली जाऊ शकतात.