कोरोना काळात मृत पावलेल्या संघपाल कोलते यांच्या पत्नीला सेवेत घेणे, कामगारांच्या कामाचे वेळ बारा तास ऐवजी आठ तास करणे, तसेच कामगारांना औद्योगिक कायद्याप्रमाणे परिमंडळ एक नुसार वेतन देणे आदी प्रमुख मागण्यांचा यात समावेश होता. यासाठी अनेक दिवसांपासून कामगारांचा संघर्ष सुरू होता. लोकमतने ही कामगारांची ही समस्या प्रकर्षाने वारंवार मांडली. अखेर अपर कामगार आयुक्तांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीत या विषयावर तोडगा निघाला. बैठकीला राजेश रंगारी, अपर कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, साक्षी बिस्किट कंपनी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, कामगारांच्यावतीने भारतीय जनता कामगार महासंघाचे राहुल नागदिवे, सागर प्रधान, प्रतीक रंगारी आदी उपस्थित होते. त्यानुसार संघपाल कोलते यांच्या पत्नीला सेवेत घेण्याची बिस्किट कंपनी प्रशासनाने मान्य केले. कामगारांच्या तासासंदर्भात बारा तास ऐवजी आठ तास करण्याचेही मान्य करण्यात आले. कामगारांच्या मागणीनुसार कामगारांना परिमंडळ एक नुसार वेतन मिळावे, असा आग्रह होता; परंतु हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्रात येत नसल्याने या ठिकाणी परिमंडळ एक नुसार वेतन देणे शक्य नाही, यावर तोडगा म्हणून परिमंडळ २ नुसार वेतन देण्याचे मान्य करण्यात आले. यापूर्वी कामगारांना परिमंडळ तीन नुसार वेतन मिळत होते. आजच्या बैठकीत कामगारांच्या मागण्यांना न्याय मिळाल्याने कामगारांनी महादूला येथील कार्यालयासमोर विजयोत्सव साजरा केला. यावेळी कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले, उपसरपंच आशिष राऊत, विश्वनाथ चव्हाण, अजित गेडाम, नितीन मनोहर, दिलीप सुधीर, राजकुमार गजभिये ,राहुल खोबरागडे, मनोज नवले, वनिता गावंडे, गौतम वानखेडे, चंद्रशेखर जिभे, बापूराव जिभे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कामगारांना दिल्या टिप्स
महादुला येथे आनंदोत्सव साजरा करताना राजेश रंगारी,नरेंद्र धानोले, आशिष राऊत यांनी उपस्थित कामगारांना काही सूचना केल्या. कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी हा विजय म्हणून समजू नये. अन्यायाविरुद्ध न्याय मिळाला. कामगारांनी कंपनीत काम करताना कंपनी व्यवस्थापनाला सहकार्य होईल. कंपनी व्यवस्थापनाला फायदेशीर ठरेल, अशाच भूमिकेने वागावे, कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये वाद वाढणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कामगारांनी आपले काम अधिक प्रभावी करावे, यानंतर जर व्यवस्थापनाकडून अन्याय होत असेल तर मग त्याविरुद्ध आपण पुन्हा न्याय मागू, अशा प्रकारच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.