नागपूर विभागात ६८१ जणांना सर्पदंश : वर्धेत सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिकसुमेध वाघमारे - नागपूरनागपूर विभागात जानेवारी ते ३० जून २०१४ या दरम्यान ६८१ जणांना साप चावले. यावरून रोज तीन जणांना सर्पदंश होत असल्याचे समोर आले आहे. सर्पदंशाची ही संख्या मोठी असली तरी याच्या तुलनेत मृत्यूची संख्या फार कमी आहे. सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना वर्धा जिल्ह्यातील आहेत. येथे २६८ जणांना साप चावले, तर वनक्षेत्र व धान शेती मोठ्या प्रमाणावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे २९ जणांना साप चावल्याची नोंद आहे.भारतामध्ये दरवर्षी २ लाख ५० हजार लोकांना सर्पदंश होतो आणि यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू हा वेळेवर प्रथमोपचार न झाल्यामुळे होतो. आजही समाजामध्ये सापांविषयी गैरसमज अंधश्रध्दा रूढ आहेत. परंतु जनजागृती आणि विज्ञानाच्या माध्यमातून त्या दूर होताना दिसत आहे. साप या प्राण्याविषयी मानवाला प्रचंड भीती वाटते आणि या कारणाने मानव त्याला ठार करतो.तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक साप चावण्यामागे आपलीच काहिना काही चूक असते. कारण कोणताच साप स्वत:हून तसेच विनाकारण कधीच चावा घेत नाही. सर्पदंश टाळण्यासारखा आहे, परंतु नागपूर विभागात जानेवारी ते जून २०१४ या कालावधीत ६८१ जणांना सर्पदंश झाले. नागपूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या सहा महिन्यात चंद्रपूरमध्ये सर्पदंशाने एकाही मृत्यूची नोंद नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गाव अरण्यात आणि त्याला लागून आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमणावर घडतात. यातच आरोग्य व्यवस्थाही बळकट नाही. असे असताना, सहा महिन्यात फक्त २९ जणांना साप चावल्याची तर एका जणाचा मृत्यूची नोंद आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वात जास्त सर्पदंशाची नोंद आहे परंतु मृत्यूची संख्या एक आहे. याच्या खालोखाल नागपूर जिल्ह्यात १३८ सर्पदंश तर दोघांचा मृत्यूची नोंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये भंडाऱ्यात ८८ जणांना सर्पदंश, एकाचा मृत्यू, गोंदियात ७७ जणांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात ८१ जणांना सर्पदंश झाले आहे. अशी घ्या काळजी़़़जिथे साप असण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी शक्यतोवर खाली झोपू नये़ रात्री घराबाहेर पडताच बुट घालून निघावे़ हातात एक काठी ठेवावी़ चालताना काठीने जमिनीवर ठक ठक करीत चालावे. धरणीचे कंपनं सापाला कळतात़ त्यामुळे तोच वाटेतून दूर होतो़ आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यामुळे अशीच काळजी वसतिगृहात राहताना घ्यायला हवी. गावठी उपचार न करता सर्पदंश झाल्यावर रुग्णालयात दाखल करावे.
रोज तीन जणांना चावतात साप
By admin | Published: July 24, 2014 1:04 AM