नागपूर : वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे नवीन वर्षांत उपराजधानीत महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी त्यांनी पोलीस जिमखान्यात पत्रकारांशी अनाैपचारिक चर्चा केली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, २ नोव्हेंबरला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिला पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव पाठविला होता. त्याची लवकरच पूर्तता होणार आहे. सायबर पोलीस ठाण्यात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह त्यांना विशेष प्रशिक्षण, गुन्ह्यांची उकल करण्यासाठी लागणाऱ्या साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. गतिमान तपास करून शिक्षेच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.
पोलीस मुख्यालयाचे नूतनीकरणाचे काम काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल. राज्यात महिला संदर्भातील गुन्ह्यांना गांभीर्याने घेऊन गुणवत्तापूर्वक तपास करण्यावर भर देण्यात येणार आहे. महिला मुलींशी संबंधित गुन्ह्यात आरोपीला तातडीने अटक आणि शिक्षेच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस वेलफेअरच्या दृष्टिकोनातून सकारात्मक उपाययोजना राबविण्यासोबतच पोलिसांची प्रतिमा अधिक स्वच्छ करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
नक्षल्यांची घेराबंदी
नक्षलवाद्यांची घेराबंदी करण्यासाठी पोलीस विभागाच्या आंतरराज्य परिषदा घेणे सुरू असून या प्रयत्नांना चांगले यश मिळत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
महिला व जेष्ठांच्या सुरक्षेवर भर
काटोल येथे महिला पोलिसांची बटालियन तयार करण्याचा जो प्रस्ताव होता, त्याला नवीन वर्षांत गती दिली जाईल. महिला व जेष्ठांच्या सुरक्षेवर भर दिल्या जाईल.
पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
गुन्ह्यांचा तपास करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. साक्षीदार आणि सरकारी वकिलांनाही तयार केले जाणार आहे.