लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मार्चं २०२१ मध्ये रेकॉर्ड ७६,२५० जण पॉझिटिव्ह आलेत. तर ७६३ जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाने चाचण्यांची संख्याही सप्टेंबरच्या तुलनेत दुप्पट केली. मार्च महिन्यात २,७९,१४३ नमुने तपासण्यात आले. यापैकी २०.११ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. या महिन्यातील परिस्थिती अशी राहिली की चाचणी करणारा प्रत्येक पाचवा व्यक्ती पॉझिटिव्ह आला. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रत्येक चौथा व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ४८,४५७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. १,९६,७२२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २४.६३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले होते. त्या महिन्यात सर्वाधिक १४०६ लोकांनी आपला जीव गमावला होता. सप्टेंबरच्या तुलनेत या वर्षी मार्चमधील मृत्यू ४५ टक्के कमी आहेत. परंतु या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५५ पेक्षा अधिक मृत्यू दररोज होताहेत. त्यामुळे प्रशासनाची पुन्हा चिंता वाढली. नवीन पॉझिटिव्ह रुग्णांबाबत मार्च महिना सर्वाधिक संसर्गित राहिला.
बेड फुल्ल, रुग्णांना मिळत नाही आहे उपचार
नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यात वाढलेल्या संसर्गामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ३९,३३१ झाली आहे. यात शहरातील २८,३२३ आणि ग्रामीणचे ११,००८ आहेत. यातील ७,९८९ विविध शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ३१,३४२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. होम आयसोलेशनच्या पर्यायामुळे प्रशासनाला थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु नागपुरात शोधूनही बेड मिळत नाही आहेत. जर होम आयसोलेशनचा पर्याय नसता तर गोंधळ उडाला असता. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ८२५३ सक्रिय रुग्ण होते.
अशी वाढत गेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या
महिना नमुने तपासणी पॉझिटिव्ह टक्केवारी
मार्च-२०२० ६६६ १६ २.४०
एप्रिल-२० २२७२ १२३ ५.४१
मे-२० ९१७१ ३९२ ४.२७
जून -२० १२,३९१ ९७२ ७.८४
जुलै -२० ५५,१०० ३८८७ १३.७८
ऑगस्ट-२० १,७५,३१७ २४,१६३ १३.७८
सप्टेंबर-२० १,९६,७२२ ४८,४५७ २४.६३
ऑक्टोबर-२० १,८१,३९५ २४,७७४ १३.६५
नोव्हेंबर -२० १,५१,२३३ ८,९७९ ५.९३
डिसेंबर -२० १,४५,९१५ १२,००२ ८.२२
जानेवारी -२०२१-१,३३,५१७ १०,५०७ ७.८६
फेब्रुवारी-२१ - १,८१,४३५ १५,५१४ ८.५५
मार्च -२१ ३,७९,१४३ ७६,२५० २०.११
महिनानिहाय मृत्यू
मार्च- ००
एप्रिल ०२
मे ११
जून १५
जुलै ९८
ऑगस्ट ९१९
सप्टेंबर १४०६
ऑक्टोबर ९५२
नोव्हेंबर २६९
डिसेंबर २५८
जानेवारी २२८
फेब्रुवारी १७७
मार्च ७६३