लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाची शासन यंत्रणा, न्याययंत्रणा मूठभर लोकांच्या हातात आहे. येथे कायदा करण्यासाठी, झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि कायदा रद्द करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध आहे म्हणून निश्चिंत राहणे योग्य नाही. कारण ही यंत्रणा आपण निर्माण केली असून त्यास वळण लावण्याची जबाबदारीही आपलीच आहे. प्रत्येक व्यक्ती शासन यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ असतो, असे मनोगत मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी व्यक्त केले.सी. मो. फाऊंडेशनच्यावतीने विविध पाच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विनोबा विचार केंद्रात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे होत्या. फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे, प्रा. सुषमा कल्लावार, सावनेरच्या मूकबधिर विद्यालयाच्या प्राचार्य मंगला समर्थ व्यासपीठावर होत्या. यावेळी सी. मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय फाऊंडेशनतर्फे डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवाकार्य पुरस्कार कल्याणी ढोले, मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार अॅड. पारोमिता गोस्वामी, ना. बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. जयश्री कापसे-गावंडे, , डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शारदा साठे पुढे म्हणाल्या, आपला समाज व देश ईश्वर किंवा शासन यंत्रणेवर नाही तर कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता सातत्याने समाज सेवेचे काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांमुळे टिकून आहे. चांगला समाज, चांगला देश घडविण्यासाठी प्रत्येकाने समाजातील हिंसाचार, धार्मिक द्वेष, जातीयवादाला मूठमाती देण्याची गरज आहे. निसर्गाकडून मिळालेला हा जन्म माणसांच्या सत्कार्यी लावण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.लीलाताई चितळे यांनी, भूकेने तान्हुले मरतील, अशी व्यवस्था नको, असा उद्वेग व्यक्त केला. देशातील चार व्यवस्था बेकाम होत असून एक व्यवस्था मनमानी करीत आहे. ही अव्यवस्था दूर करण्यासाठी प्रत्येकाने उभे राहणे गरजेचे आहे. आज देशाचे स्वातंत्र्य गोंधळात असून ही अवस्था पाहून एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मन उदास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.समाज व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले तर निर्भयता निर्माण होईल व कोणतीही सत्ता ही समाजव्यवस्था बिघडविण्याचे धाडस करणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना सविता देव-हरकरे यांनी पुरस्काराची राशी गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राला देण्याचे जाहीर केले. प्रास्ताविक फाऊंडेशनच्या सचिव भारती झाडे यांनी केले. संचालन दुर्गा समर्थ यांनी केले व मंगला समर्थ यांनी आभार मानले.