लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जेची बचत ही ऊर्जेची निर्मिती असून प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या दरम्यान ऊर्जेची बचत करावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल यांनी केले.‘डीआरएम’ कार्यालयाच्या समाधान सभागृहात राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी अप्पर विभागीय रेल्वेव्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (सामान्य) नामदेव रबडे, मुख्य आरोग्य अधीक्षक डॉ. व्ही.के.आसुदानी, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता महेश कुमार, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, वरिष्ठ विभागीय सामुग्री व्यवस्थापक सतीशन, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता सुमित नुपुर हाजरा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जी व्ही. जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘डीआरएम’ उप्पल म्हणाले, ऊर्जेची बचत आपले कार्यालय, नियंत्रण कार्यालय, स्टेशन, डेपो आदी परिसरात करणे आवश्यक आहे. थर्मल पॉवर प्लान्टमधून ऊर्जेची निर्मिती करताना वायू प्रदुषण होऊन वातावरण दूषित होते. त्यामुळे विभागातील स्टेशनच्या इमारतीवर, कार्यालय आणि डेपोत अधिकाधिक सोलर पॅनल स्थापन करून ऊर्जेची निर्मिती करणे गरजेचे आहे. विभागाने या वर्षी ९.३८ टक्के विजेची बचत केल्यामुळे विजेच्या बिलात कपात झाली आहे. ऊर्जा बचतीसाठी पारंपरिक लाईटऐवजी एलईडी लाईट लावण्यात आले असून सर्व उपकरणे पाच स्टार दर्जाची लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नामदेव रबडे यांनी प्रास्ताविकातून ऊर्जेच्या बचतीसोबत विजेच्या उपकरणांची योग्य देखभाल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विजेची बचत करण्यासाठी रेल्वेगाडीला ग्रीन सिग्नल मिळण्यास उशीर असल्यास संबंधित रेल्वेगाडीचे इंजिन बंद करून विजेची बचत करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. ऊर्जा बचतीसाठी उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी ‘डीआरएम’ उप्पल यांच्या हस्ते बॅच आणि शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यात परासियाचे जी. एल. झा, तडालीचे स्टेशन मॅनेजर बालेंद्र सिंह, नागपूरचे एस. एस. मनी, विनोद कुमार यांचा समावेश आहे. याशिवाय तडाली, नागरी आणि पालाचौरी रेल्वेस्थानकाला पुरस्कार देण्यात आला. वीज बचतीसाठी जुनारदेव डेपोला रोलींग शिल्ड देण्यात आली.
प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याने ऊर्जेची बचत करणे आवश्यक : मनिंदर सिंह उप्पल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 1:26 AM
ऊर्जेची बचत ही ऊर्जेची निर्मिती असून प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या दरम्यान ऊर्जेची बचत करावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल यांनी केले.
ठळक मुद्देराष्ट्रीय ऊर्जा संरक्षणदिनानिमित्त चर्चासत्र