लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात हृदयरोगाचे तीन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी सुमारे ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे. अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतरच कळते. विशेष म्हणजे, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०२५पर्यंत तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण १२० ते १२५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली.हृदयरोग होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम हे प्रतिबंधात्मक उपाय आयोजले पाहिजेत. चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. साखरेचे प्रमाण वाढू देऊ नये. जीवनात ताणतणाव निर्माण होतील असे प्रसंग टाळावे. रागाला आवर घालणे, पथ्य पाळणे व वजन नियंत्रित ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे आवश्यक आहे. चाळीशी गाठलेल्या प्रत्यकाने नियमित रक्तदाब, ईसीजी, इको व टीएमटीची चाचणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञानी केले आहे.भारतात ३२ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे-डॉ. संचेतीहृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, भारतात दरवर्षी ३२ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतो. देशात एक लाख लोकसंख्यामध्ये २७२ रुग्ण हे हृदयविकाराचे असतात. भारतात साधारण तीन कोटी लोक हृदयविकाराने ग्रासले आहेत. २०१६ मध्ये १७ लाख भारतीयांचा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे. हृदयरोगापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे व्यसन, धूम्रपान, स्थूलतेचे प्रमाण टाळले पाहिजेत.८० टक्के हृदयरोग टाळता येतो-डॉ. अर्नेजाप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा म्हणाले, हृदयविकाराच्या रुग्णांत दिवसेगणिक वाढ होत आहे. विशेषत: कमी वयात हा आजार दिसून येत असल्याने चिंताजनक स्थिती आहे. यामुळे आता प्रत्येकाने हृदयाशी मैत्री करणे आवश्यक आहे. यासाठी तीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात. पहिले म्हणजे, ‘अॅक्टिव्ह लाईफ’ म्हणजे नियमित व्यायाम, दुसरे तंबाखू व सिगारेटपासून मुक्ती आणि तिसरे म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवून आहारात समतोल साधणे. या गोष्टींचे पालन झाल्यास ८० टक्के हृदयरोग दूर ठेवणे शक्य आहे.हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मोहन नेरकर म्हणाले, तीन पुरुषांच्या तुलनेत एका महिलेला हृदयविकाराचा आजार होऊ शकतो. विशेषत: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयविकाराची जोखीम वाढते. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ‘इस्ट्रोजेन’ या हार्मोनची पातळी कमी होते. त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. महिलांसोबतच पन्नाशीच्या आतील पुरुषांमध्ये हृदयविकार वाढत आहे. रुग्णालयात येणाऱ्या दोन हजार रुग्णांमध्ये साधारण १० टक्के पुरुष रुग्ण हे हृदयविकाराच्या तक्रारी घेऊन येतात.वाढत्या व्यसनामुळे युवकांमध्ये हृदयरोग-डॉ. वाशिमकरकार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेचे अध्यक्ष डॉ. सुनील वाशिमकर म्हणाले, युवा वर्ग देशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र, अयोग्य जीवनशैली व वाढत्या व्यसनामुळे त्यांच्यात हृदयरोग बळावत चालला आहे. जे युवक खूप जास्त तंबाखू आणि दारूचे सेवन करतात, जंक फूड खातात, व्यायाम करीत नाही त्यांना हृदयाचे आजार होतात, हे सत्य आहे. परंतु हे सुद्धा पहायला मिळत आहे की, जे युवक निरोगी दिसतात, ज्यांना कुठलेच व्यसन नाही, त्यांच्यामध्येही हृदयाचे विकार होतात. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढलेले प्रदूषण होय.