१०० टक्के ब्लॉकेजमध्येही होते एन्जिओप्लास्टी : सीएसआयचा पदग्रहण सोहळा नागपूर : देशात हृदयरोगाचे दोन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे. धक्कादायक म्हणजे अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हार्टअटॅक आल्यानंतरच कळते. यामुळे या आजाराविषयी व्यापक जनजागृती होऊन योग्य उपचार उपलब्ध करून होणे आवश्यक आहे, अशी माहिती कार्डियालॉजीकल सोसायटी आॅफ इंडिया, (सीएसआय) विदर्भ शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व हृदयरोग विशेषज्ञ डॉ. नितीन तिवारी यांनी येथे दिली. कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी सकाळी रामदासपेठ येथील खासगी हॉटेलमध्ये थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. सीएसआयचे नवनियुक्त सचिव डॉ. अमोल मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमानंतर २४ वे डॉ. के.जी. देशपांडे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्य वक्ते म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाशवीर पारीख व डॉ. मोहम्मद रेहान सईद उपस्थित होते. डॉ. तिवारी म्हणाले, हृदय हा स्नायू संपूर्ण शरीरातल्या सर्व पेशींना प्राणवायू व पौष्टिके रक्तामार्फत पोचविण्याचे काम करणारा पंप आहे. पेसमेकरची गरज भासणारी सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी हृदयाची व्याधी म्हणजे ‘ब्रॅडिकार्डिआ’ यात शरीराच्या गरजा पुरविण्यासाठी आवश्यक त्या गतीने हृदयाचे ठोके पडत नाहीत किंवा त्यात अनियमितता येते. साधारण पम्पींग ३५ टक्के कमी होते. हृदयाची लय धिमी झाल्याच्या सर्वाधिक समस्यांवर आजमितीस उपलब्ध असलेली एकमेव उपचार पद्धती म्हणजे पेसमेकरचे प्रत्यारोपण होय. पेसमेकर अचूकपणे कालबद्ध केलेली विद्युतकंपने निर्माण करून त्यास उत्तेजना देतो. ही विद्युतकंपने तुमच्या हृदयाची आकुंचन/प्रसारणे सामान्य हृदयलयीच्या जवळपास आणतात व अशा प्रकारे बॅड्रिकार्डिआचे दुष्परिणाम कमी केले वा टाळले जातात, असेही ते म्हणाले. डॉ. प्रकाशवीर पारीख म्हणाले, १०० टक्के ब्लॉकेजमध्येही अॅन्जिओप्लास्टी होते. जपानमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. आपल्याकडे काहीच डॉक्टर हे करतात. ‘छोट्या चिरेच्या हृदय शल्यक्रिया तंत्रात झालेले परिवर्तन’ या विषयावर बोलताना डॉ. मोहम्मद रेहान सईद म्हणाले, अद्यावत तंत्रज्ञान, कौशल्य व औषधांमुळे ‘ओपन हार्ट सर्जरी’चे प्रमाण कमी होत आहे. यावेळी त्यांनी सर्जरीतील कौशल्यावर विशेष भर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)
दरवर्षी ६० लाख नवे हृदयरोगी
By admin | Published: September 28, 2015 3:20 AM