नोकरी करणारच : अमृता फडणवीस देवेंद्र मुख्यमंत्री झाले म्हणून मी नोकरी करू नये, यात मला अर्थच वाटत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात प्रगतीसाठी धडपडत असते. देवेंद्रने स्वत:च्या प्रतिभेने आणि कामाने मुख्यमंत्री पद गाठले. राजकारण आणि समाजकारण हे त्यांचे क्षेत्र आहे. मी बँन्कर आहे. ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही मी नोकरी करीत होते आणि भविष्यातही करणारच. पती देवेंद्र यांचीही त्यासाठी काहीही हरकत नाही, त्यामुळे नोकरी करीत राहणार, असे मत देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र मुख्यमंत्री झालेत तरीही माझे काम सुरू राहणार आहे. कारण ते माझे क्षेत्र आहे. मुळात राजकारणाच्या निमित्ताने देवेंद्र सातत्याने व्यस्त असतात. अनेकदा ते घरीही येऊ शकत नाहीत. त्यामुळे घरी राहण्यापेक्षा नोकरी केल्याने मलाही माझ्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते. याशिवाय प्रत्येक स्त्रीने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपायला हवे. तिनेही आपल्या क्षेत्रात कर्तृत्व दाखविण्याचा प्रयत्न करीत राहणे व्यक्ती म्हणून मला महत्त्वाचे वाटते. नोकरी आणि घर सांभाळून अमृता पती देवेंद्रच्या यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्यासह खंबीरपणे उभ्या आहेत. देवेंद्र यांनाही अमृता यांनी त्यांच्या क्षेत्रात काम करीत राहावे आणि ज्ञानार्जन करीत राहावे, असे वाटते. देवेंद्र आणि अमृता या दोघांनाही अर्थशास्त्राची आवड आहे. अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या बाजूंवर त्यांची चर्चा होते. यावेळी अमृता यांना असलेले ज्ञान आणि बाजारपेठेतील उलाढालींबद्दल त्या देवेंद्र यांच्याशी चर्चा करीत असतात. फडणवीसांचा संतापही संयमीच देवेंद्र फडणवीस संतापी आल्याचे फारसे ऐकिवात नाही आणि कुणी त्याचा अनुभवही घेतला नाही. पण देवेंद्र यांना संताप मात्र नक्की येतो. आपल्याला संताप आलेला आहे आणि आपण रागावलो आहोत, हे ते भासू देत नाहीत. देवेंद्र संताप आल्यावर जरा आवाज वाढवून दोन वाक्य बोलतात आणि आपली नाराजी व्यक्त करतात. पण त्यानंतर थोड्याच वेळात ते नॉर्मल झाले असतात. एखादे काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो, असे त्यांच्यासह काम करणारे त्यांचे स्वीय सहायक चेतन मोरे यांनी सांगितले.
प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रात कार्य करावे
By admin | Published: October 30, 2014 12:47 AM