अभिवृत्तिप्रमाणे स्त्री, पुरुष अथवा थर्ड जेंडर म्हणूनही स्वतःचे अस्तित्व निवडण्याचे स्वातंत्र्य समाजाने प्रत्येक व्यक्तीस द्यावे. जेणेकरून समाजात कोणासही मन मारून जगावे लागणार नाही. असे झाल्यास समाजास खरे व्यक्ती स्वातंत्र्य मिळेल, असे प्रतिपादन सारथी संस्थेच्या किन्नर समूह कार्यकर्त्या व नृत्यांगना मोहिनी यांनी केले.
नागपुरात प्रथमच सुरू झालेल्या ‘रूबरू’ ह्युमन लायब्ररीच्या दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. परांजपे विद्यालय बजाज नगर येथे झालेल्या ह्यूमन लायब्ररीच्या दुसऱ्या सत्रात थर्ड जेंडर असलेल्या मोहिनीने 'मी मोहित नाही मोहिनी आहे' आणि प्रवास करताना स्त्री म्हणून आलेल्या विचित्र अनुभवांना भिडलेल्या लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या भावना खरे यांनी 'ही चेन ओढायलाच हवी' ही पुस्तके वाचक श्रोत्यांपुढे मांडलीत.
खूप मोठ्या प्रमाणात वाचकांचा प्रतिसाद लाभलेल्या 'रूबरू ह्यूमन लायब्ररी' चे हे दुसरे सत्र होते. दर महिन्यात विविध व्यक्ती संवादाद्वारे आपल्या आयुष्याचे पुस्तक या उपक्रमाद्वारे सांगत आहेत.
यावेळी मोहिनीने अगदी बालवयापासून तिच्या पुरुष असलेल्या शरीरात दडलेल्या स्त्रीत्वाचा प्रवास मांडला. या प्रवासात अगदी लहान वयात आलेले शोषणाचे अनुभव, अपमानाचे प्रसंग आणि मानसिक घालमेल मांडले. तसेच समाजाचे कलुषित विचार व वागणूक यावर टीका केली. आता तरी जगाने मानसिकता बदलायला हवी आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यायला हवे असेही अंगावर रोमांच उभे करणारे मनोगत व्यक्त केले.
'ती चेन ओढायलाच हवी' हे पुस्तक मांडताना भावना खरे यांनी प्रवास करताना आलेले विदारक अनुभव तर मांडलेच परंतु संघर्षाद्वारे एक स्त्री कसा न्याय मिळवून घेऊ शकते, हे त्यांच्या प्रवासाने उलगडून दिले. त्यांचे अनुभव ऐकताना अनेक वाचक श्रोत्यांनी प्रेरणा मिळाल्याचे सांगत हे अनुभव आम्हालाही अशा प्रसंगात बळ देतील असे म्हटले.या उपक्रमास रुबरू ह्युमन लायब्ररीची टीम यासह कार्यकारी अध्यक्ष डॉ स्वाती धर्माधिकारी सचिव वर्षा बाशू कोषाध्यक्ष अडवोकेट क्षितिज धर्माधिकारी उपस्थित होते