नागपूर : मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर घरातून हाकलून दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने स्वत:च्याच पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. बेलतरोडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शिवणगाव येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. शैजाबाई नागपुरे (५३) असे मृत महिलेचे नाव असून, बाबाराव नागपुरे (५६) हा आरोपी आहे.
बाबाराव हा भाजीविक्रेता आहे. बाबारावची पहिली पत्नी २० वर्षांपूर्वी तीन वर्षांच्या मुलासह घर सोडून गेली होती. यानंतर शैजाबाई बाबारावकडे पत्नी म्हणून राहत होती. शिवणगावात बाबारावची शेती होती. ती विकून वर्ध्यातील उमरी येथे शेती घेतली आणि साकेतनगरी येथे घर बांधले. तो शैजाबाईसोबत साकेतनगरी येथील घरातच राहत होता. दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू होता. शैजाबाईने मालमत्ता आपल्या नावे करत बाबारावला घरातून काढले होते. यातूनच तो पेटला होता. मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता शैजाबाई शिवणगावातील प्लॉटवर उभ्या राहून मजुरांना कामाला लावत असताना बाबाराव तिथे पोहोचला व शैजाबाईशी वाद घालू लागला. शैजाबाईने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात बाबाराव जखमी झाले. दरम्यान, दगडावर पाय अडकल्याने शैजाबाई जमिनीवर पडली. बाबारावने मोठ्या दगडाने डोके ठेचले व तो तेथून फरार झाला. हा प्रकार पाहून घटनास्थळावरील मजुरांची भीतीने तारांबळ उडाली. खुनाची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली व पोलिसांना माहिती देण्यात आली. शैजाबाईला मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी बाबारावचा शोध घेत त्याला अटक केली.
घरातून हाकलल्याने संतापला होता आरोपी
चार महिन्यांपूर्वी बाबारावने उमरीचे शेत १८ लाखांना विकले व ती रक्कमही शैजाबाईने ठेवली होती. साकेतनगरीतील घरदेखील स्वत:च्या नावे करवून घेतले होते. शिवणगावची शेती मिहान प्रकल्पाच्या अधिग्रहणात गेली व त्या बदल्यात बाबारावला तीन हजार चौरस फुटांचा भूखंड मिळाला. काही दिवसांपूर्वी शैजाबाईंने बाबारावला साकेतनगरीतील घरातून हाकलून दिले होते. घरातून हाकलून दिल्यानंतर शैजाबाई पोलिसांत खोटी तक्रार करेल या भीतीने बाबाराव ताजबागजवळ राहत होता. शैजाबाईला शिवणगावातील प्लॉटवरही घर बांधायचे होते. दोन दिवसांपूर्वी भूखंडावर बांधकाम सुरू केले. संपत्ती स्वत:च्या नावावर करून घेत घरातून काढल्याने बाबाराव संतप्त झाला होता. शिवणगाव भूखंडावर शैजाबाईने बांधकाम सुरू केल्याचे समजताच बाबारावची तळपायाची आग मस्तकात गेली व त्यातूनच त्याने खून केला.