नागपूर : करिअर आणि नव्या युगाचे ध्येयशिखर गाठण्यास आतुर असलेल्या नव्या पिढीसाठी इतिहास म्हणजे निव्वळ टाइमपास आहे. त्यात गुंतून वेळ घालविण्यापेक्षा त्या वेळेचा सदुपयोग करावा, अशी त्यांची मानसिक म्हणा वा बौद्धिक स्थिती आहे. त्यांच्यालेखी अवतीभवती असलेल्या खाणाखुणा, ऐतिहासिक पुरावे आणि जिवंत माणसेही निरुपयोगी आहेत. मात्र, काहींसाठी ते अतिशय महत्त्वाचे आहेत. असाच एक सशस्त्र क्रांतीचा जिवंत पुरावा नागपुरातील धंतोलीत आहे. इंग्रजांवर बॉम्ब टाकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक झाली आणि दोन वर्षाच्या खटल्यानंतर ते सुटलेही. त्याच क्रांतिकारक राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे.
१९४२ मध्ये इंग्रजांविरूद्ध महात्मा गांधींच्या नेतृत्वात अहिंसात्मक पद्धतीने भारत छोडो आंदोलन सुरू होते. स्वातंत्र्यलढ्यात अहिंसेसोबतच सशस्त्र क्रांतीचाही मार्ग समांतर पद्धतीने अवलंबिल्या जात होता. त्याचवेळी दुसरे महायुद्धही लढले जात होते. अशा पद्धतीचा तिहेरी विळखा इंग्रजी राजवटीला बसला होता. नागपुरातही सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनेकांनी स्वीकारला होता. राजा देशपांडे हे त्यांच्यापैकीच एक आणि ते तेव्हा १७ वर्षाचे होते. बालाजी पटेकर, नोटू सिन्हा, एन.एल. राव, आनंदराव कळमकर हे त्यांचे साथीदार. हे एकही साथीदार आता हयात नाहीत. राजा देशपांडे यांनी धंतोलीच्या आपल्या घरातच बंगालच्या परिमल घोष यांच्याकडून बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याचा उपयोगही ठरला. मात्र, ते पकडल्या गेले. इतिहासात तेलंगखेडी बॉम्ब खटला म्हणून याची नोंदही आहे. दोन वर्षे तुरुंगवास झाला. खटल्यातून मुक्तताही झाली आणि पुढे तीनच वर्षानंतर भारत स्वतंत्रही झाला. विशेष म्हणजे ज्या दादासाहेब शेवडे यांनी देशपांडे यांचा खटला लढला, पुढे त्यांचीच भाची सुधा पटवर्धन यांच्यासोबत विवाह झाला. आज त्या ९५ वर्षाच्या आहेत.
* जिथे जन्म तिथेच शंभरी
ज्या घरात जन्म झाला, त्याच घरात वयाची शंभरी करणारी प्रकरणे फारच दुर्मिळ असतात. तोच योग राजा देशपांडे यांनी साधला आहे. धंतोली येथील घरातच त्यांचा जन्म झाला आणि येथेच ते वयाची शंभरी पूर्ण करत आहेत. विशेष म्हणजे, याच घरात त्यांच्या वैवाहिक आयुष्याला ७७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा मोठा मुलगा अजित हे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत तर दुसरा मुलगा अनिल हे माजी रणजीपटू आहेत आणि मुंबईत उद्योजक आहेत. तिसरा मुलगा संजय हे राजा देशपांडे यांच्याच खाण आणि क्रशरच्या व्यवसायात आहेत. मुलगी नाशिकला असते.
* सातव्या वर्षीच हरवले मातृ-पितृछत्र
सात वर्षाचे असतानाच राजा देशपांडे यांचे आई आणि वडील दोघेही गेले. त्यानंतर त्यांचे मामा पिंगळे यांनी त्यांचे संगोपन केले. सुळे हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. स्वातंत्र्य प्राप्तीला २५ वर्षे पूर्ण झाली असल्याच्या सोहळ्यात त्यांना भारत सरकारतर्फे ताम्रपट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.
..............