नागपूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात वापरण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन नव्याने उपयोगात आणण्याकरिता मोकळ्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी शुक्रवारी तो अर्ज मंजूर केला.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील मतदार ॲड. सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात वापरण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन आतापर्यंत जैसे थे परिस्थितीत ठेवण्यात आल्या होत्या. उके यांनी निवडणूक आयोगाच्या अर्जाला विरोध केला, पण न्यायालयाला त्यात गुणवत्ता आढळून आली नाही. निवडणूक आयोगाच्या वतीने ॲड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.
---------------
असे आहेत उके यांचे आरोप
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फडणवीस यांचे नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र चुकीच्या पद्धतीने स्वीकारले. प्रतिज्ञापत्र वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी विलंब करण्यात आला. दरम्यान, नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्रातील अनेक त्रुटी अवैधपणे दूर करण्यात आल्या. यासह अन्य विविध गैरप्रकार फडणवीस यांना लाभ पोहोचविण्यासाठी करण्यात आले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यात आले असे आरोप उके यांनी याचिकेत केले आहेत. तसेच, फडणवीस यांची निवड अवैध ठरवून रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.