लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात होणाऱ्या विविध निवडणुकींत मतदान प्रक्रियेसाठी उपयोगात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला ठेवण्यासाठी निश्चित अशी जागा नाही. कधी नव्या प्रशासकीय इमारतीचे स्ट्राँग रूम, तर कधी कळमना येथील गोदामांमध्ये व्यवस्था केली जाते. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन चिंतामग्न असते. मात्र, ही चिंता दूर करण्यात आली असून, एकाच ठिकाणी सगळ्या ईव्हीएम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वतीने सुरक्षेचा अभाव आणि स्थायी स्ट्राँग रूम नसल्याने उमरेड येथील स्ट्राँग रूममध्ये चोर शिरल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यामुळे, प्रशासनाची नाचक्की झाली होती. आता नागपूर जिल्हा प्रशासनाने हिंगणा तालुक्यात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची दोन गोदाम भाड्याने घेतली आहेत. एक गोदाम १० हजार चौरस फुटाचे आहे, तर दुसरे सात हजार चौरस फुटाचे आहे. सद्य:स्थितीत लोक निर्माण विभागाकडून या गोदामांच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे.
६.९५ लाख रुपये होतील खर्च
दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून ६ लाख ९५ हजार ३७७ रुपये मंजूर झाले आहेत. या निधीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या सुरक्षेसाठी गोदामात सीसीटीव्ही, सुरक्षा गार्डसह विविध व्यवस्थांचे नियोजन केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीसाठी १३ लाख ९० हजार ७५४ रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु, सरकारने केवळ ६ लाख ९५ हजार ३७७ रुपयेच मंजूर केले आहेत.
२० हजार ईव्हीएम-व्हीव्हीपॅट
२०१९ मधील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत उपयोगात आलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटला वर्तमानात कळमना येथील तीन गोदामांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. हिंगणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याच कारणाने हिंगणा विधानसभेच्या ईव्हीएम तेथेच ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीनंतर एक वर्षापर्यंत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा दुसऱ्यांदा वापर केला जात नाही. एक वर्षपर्यंत कोणताच आक्षेप न आल्याच्या स्थितीत त्यांचा वापर केला जातो. वर्तमान स्थितीत नागपूर जिल्ह्यातील विविध स्ट्राँग रूममध्ये जवळपास २० हजार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
१३ हजार ईव्हीएम परत पाठविल्या होत्या
यापूर्वी नव्या प्रशासकीय इमारतीत ठेवण्यात आलेल्या जवळपास १३ हजार ईव्हीएम हैदराबाद येथील पीआयसीएल कंपनीकडे परत पाठविण्यात आल्या होत्या. या मशीन्स १५ वर्षांहून अधिक काळापासून वापरात होत्या. त्याच कारणाने त्यांना परत पाठवून नव्या ईव्हीएमची व्यवस्था केली जात आहे.