नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञेमुळे चर्चेत आलेले दिल्लीचे माजी समाजकल्याणमंत्री राजेंद्र पाल गौतम (Rajendra Pal Gautam) हे १५ ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते दीक्षाभूमीला भेट देणार असून सायंकाळी चंद्रमणीनगर येथील मैदानावर त्यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे.
धम्मदीक्षा सोहळ्यात बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा म्हटल्याने त्यांच्या विरोधात रान उठवण्यात आले. त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञेसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांना विविध स्तरातून समर्थनही मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने चंद्रमणीनगर उद्यानासमोरील मैदानावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
‘प्रबुद्ध भारताची संकल्पना’ या विषयावर आयोजित या व्याख्यानात वरिष्ठ अधिवक्ता फिरदौस मिर्जा, अ. भा. तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड, नंदाताई फुकट, भारतीय मुस्लीम परिषदेचे अध्यक्ष प्रा. जावेद पाशा, हरकिसनदादा हटवार, मृणाल तिघारे आदी वक्ते सहभागी होतील.
राजेंद्र पाल गौतम हे शनिवारी सकाळी नागपुरात दाखल होतील. त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर नागपुरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी ते चर्चा करतील. सायंकाळी व्याख्यानात सहभागी होतील.