५ आॅक्टोबरपासून विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा : ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे महाविद्यालयांमध्ये धाकधूकनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या परीक्षांपासून सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ होणार आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये याबाबत संभ्रम असून काही ठिकाणी योग्य त्या तांत्रिक सुविधा नसल्याची प्राचार्यांची ओरड आहे. अशा स्थितीत ही हिवाळी परीक्षा विद्यापीठासोबतच परीक्षा केंद्रांचीही कसोटीच पाहणारी ठरणार आहे.५ आॅक्टोबरपासून हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होते आहे. यात प्रामुख्याने बीएसस्सी, एमए, एलएलबी, एमबीए, एमसीए, एमकॉम या विषयांच्या पुरवणी परीक्षांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमनिहाय परीक्षा केंद्रांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांतील एकूण ६४ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २० हजार विद्यार्थी बसणार आहे. तुलनेने विद्यार्थी संख्या कमी असली तरी प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते प्रश्नपत्रिकांच्या सुलभ ‘डिलिव्हरी’चे.अनेक महाविद्यालायंमध्ये आवश्यक त्या तांत्रिक सुविधा नसल्याची भूमिका ‘प्राचार्य फोरम’तर्फे अगोदरच मांडण्यात आली आहे. तांत्रिक सुविधांसाठी महाविद्यालयांना किती निधी द्यायचा याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयांतून जे प्राध्यापक परीक्षेचे काम पाहणार आहेत, त्यातील अनेकांना तंत्रज्ञानाबाबत सखोल माहिती नाही. याबाबत महाविद्यालयांनी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. याबाबत विद्यापीठाकडून आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. खटी यांनी स्पष्ट केले. परीक्षेचा दुसरा टप्पा जास्त महत्त्वाचा असून यात ३० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विद्यापीठासोबतच परीक्षा केंद्रांचीही कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2016 3:07 AM