मेडिकल : परीक्षा देणाऱ्या पीजीच्या विद्यार्थ्यांकडून गोळा केले पैसेनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) इंटर्नशिपचे प्रकरण ताजे असताना, असेच एक प्रकरण समोर आले आहे. मेडिकलच्या एका विभागाच्या पदव्युत्तर परीक्षेला बसलेल्या १२ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेण्यात आले. हे पैसे संबंधित परीक्षकावर उधळण्यात आल्याची माहिती आहे.नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने एप्रिल महिन्यात एका विभागाची पदव्युत्तर परीक्षा घेण्यात आली. या दोन दिवसीय परीक्षेसाठी विद्यापीठाने नेमलेले परीक्षक आले. परीक्षकांच्या राहण्याची, जेवण्याची सोय विद्यापीठ करीत नाही. याचा फायदा घेत संबंधित विभागाच्या एका शिक्षकाने याची माहिती पीजीची परीक्षा देणाऱ्या त्या १२ विद्यार्थ्यांना दिली. परीक्षकाला खूश ठेवल्यास परीक्षेत मदत करेल ही आशा दाखवित विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये गोळा केले.गोळा झालेल्या १ लाख २० हजार रुपयांमधून परीक्षकाच्या दोन दिवसाचा ‘थ्री-स्टार’ हॉटेलचा खर्च, जेवणाचा खर्च व परीक्षा झाल्यानंतर ताडोबा सफारीवर खर्च करण्यात आला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हा खर्च, विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात विद्यार्थ्यांकडून पैसा घेण्यापेक्षा उरलेला पैसा कुणाच्या खिशात गेला यावर संबंधित विभागात चर्चेला पेव फुटले आहे.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या पैशांतून परीक्षकावर उधळपट्टी!
By admin | Published: June 21, 2015 2:59 AM