नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांची काय स्थिती आहे, त्यांच्यासोबत कसा व्यवहार केला जातो, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी ए. अशोली चलाई यांनी अचानक नागपूर कारागृहात भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. या भेटीत चलाई यांनी महिला कैद्यांची स्थितीही जाणून घेतली.
राज्यात मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाने प्रचंड खळबळ उडवून दिली होती. यानंतर देशातील अनेक कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्याची प्रकृती बिघडल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळत नाही. त्यांना साधे प्राथमिक उपचार तात्काळ मिळणेही कठीण असून, त्या मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याची जोरदार ओरड झाली होती. काही दिवसांनी महिला कैद्यांचे हक्क डावलले जात असल्याचा एक अहवालच पुढे आला होता. या संबंधाने सर्वत्र चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेली एक युवती लैंगिक शोषणाचा बळी ठरल्याचे उघड झाले होते. शिवाय छत्तीसगडमधील कारागृहात महिला कैद्यांचे कपडे उतरवून त्यांच्यासोबत अमानविय अत्याचार केला जात असल्याचेही पुढे आल्याने देशभर खळबळ उडाली होती. त्यामुळे या आणि अशाच अनेक प्रकारांची गंभीर दखल घेत महिला आयोगाने तुरुंगातील महिला कैद्यांच्या (विदारक) स्थितीचा आढावा घेणे सुरू केेले.
या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या जॉईंट सेक्रेटरी ए. अशोली चलाई, दिल्ली यांनी नागपूर कारागृहाचा दाैरा केला. चलाई यांनी या पाहणी दाैऱ्यात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाची, खास करून येथे बंदिस्त असलेल्या महिला कैद्यांच्या बॅराकींची सूक्ष्म पाहणी केली. त्यांनी येथील महिला कैद्यांना काय सुविधा मिळतात, त्यांच्या राहण्या, खाण्यासोबतच अन्य आवश्यक गरजांबाबत कारागृह प्रशासनाकडून काय केले जाते, त्यासंबंधानेही आढावा घेतला. महिला कैद्यांसाठी सध्या काय उपक्रम राबविले जातात, शिक्षा भोगून गेल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासंबंधाने काय प्रयत्न आहेत, त्याचीही माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर आणखी काही चांगल्या उपक्रमांची सुरूवात करण्यासंबंधाने सूचना केल्या.
महिला कैद्यांसोबत संवाद, आस्थेने विचारपूस
येथील मध्यवर्ती कारागृहात एकूण ९५ महिला कैदी आणि त्यांची पाच लहान मुले आहेत. कारागृह अधीक्षक वैभव आगे आणि उपअधीक्षक दीपा आगे यांच्याकडून त्यांच्या संबंधीची माहिती घेतल्यानंतर चलाई यांनी महिला कैद्यांसोबत संवाद साधला. त्यांची आस्थेने विचारपूसही केली. महिला कैद्यांकडून तयार करण्यात आलेल्या आकर्षक आणि दर्जेदार कपडे, शॉलची पाहणी केल्यानंतर त्यांनी महिला कैद्यांचे काैतुकही केले.