गणेश खवसे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : आमदार म्हटले की त्यांचा रुतबा, त्यांचा थाट, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, आलिशान वाहन असे चित्र साधारणत: आपल्या डोळ्यासमोर येते. त्यातच अलीकडे, आमदारांचा ‘स्मार्ट’ लूक ‘लय भारी’ आहे. स्मार्टफोन, काळा गॉगल, पांढरा कुर्ता-पायजामा असाच त्यांचा पेहराव असतो. मात्र यामध्ये आपले ‘सर्वसामान्य’पण जपणारे आमदार आजही अपवादात्मक नजरेस पडतात. त्यात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यात आणखी एक नाव जोडल्या गेले ते आमदार जे. पी. ऊर्फ जीवा पांडू गावित यांचे. अत्यंत साधी राहणी असलेले हे आमदार महाशय आमदार निवासाच्या इमारत क्र. १ मधील खोली क्र. १६ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुक्कामी आहेत.आ. जीवा गावित हे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. १९७८ पासून ते आमदार असून त्यात केवळ १९९५ चा अपवाद आहे. ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्याकडे पाहिल्यास ‘हा माणूस आमदार आहे’ असे कुणालाच वाटणार नाही, एवढी साधी राहणी गावित यांची आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आ. गावित हे नागपुरात दाखल झाले आहेत. आमदार निवासाकडे आमदार पाठ फिरवित असल्याचे चित्र असताना हे ज्येष्ठ आमदार मात्र आपल्या परंपरेप्रमाणे आमदार निवासातच मुक्कामाला आहे. त्यांच्यासोबत सध्या त्यांचे कुटुंबीयही आलेले आहे.मी आमदार आहे!सोमवारी (दि. ११) हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर आ. जीवा गावित हे आॅटोने आमदार निवासापर्यंत आले. परंतु प्रवेशद्वारावरच सुरक्षा व्यवस्था म्हणून आॅटो थांबविला. आत जाता येणार नाही, असे पोलिसांनी सांगताच ‘मी आमदार आहे’ असे आ. गावित यांना सांगावे लागले. यावरून त्यांची राहणी, साधेपणा दिसून येतो. विशेष बाब अशी की, २०१४ मध्ये त्यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणूनही कार्यभार सांभाळला. त्यांच्यारुपाने विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्याला हा मान मिळाला. एवढे नाव असूनही त्यांचे राहणीमान ‘सर्वसामान्य’ आहे.
असेही एक ‘सर्वसामान्य’ आमदार! ; आॅटोने गाठले आमदार निवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 3:08 PM
आमदार म्हटले की त्यांचा रुतबा, त्यांचा थाट, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, आलिशान वाहन असे चित्र साधारणत: आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र यामध्ये आपले ‘सर्वसामान्य’पण जपणारे आमदार आजही अपवादात्मक नजरेस पडतात.
ठळक मुद्देपोलिसांकडे करवून द्यावी लागली स्वत:ची ओळखफाईव्ह स्टारमध्ये नाही, आमदार निवासातच मुक्काम