वसीम कुरैशी
नागपूर : बीई फायर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रायोगिक शिक्षणाअभावी परीक्षा झाली असून, आतापर्यंत टेक्निकल मॉड्युलही तयार झाले नसल्याची माहिती आहे.
व्यावहारिक व प्रात्यक्षिक ज्ञानाविना इंजिनिअरिंगमध्ये कोणत्याही कोर्सचे महत्त्व नाही. पण देशातील एकमेव फायर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान व्यावहारिक व प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले नाही, शिवाय टेक्निकल मॉड्युलचे निर्माण कार्य पूर्ण करण्यावर भर देण्यात आला नाही. या कॉलेजमध्ये परीक्षा देणारे युवक देशात आणि विदेशात फायर फायटिंगकरिता सेवा देतात. परंतु जमिनस्तरावर अर्थात प्रात्यक्षिक ज्ञान न मिळाल्याने ते संकटात येऊ शकतात. कॉलेजमध्ये अनेक उपकरणे जानेवारी २०२० पासून आतापर्यंत धूळ खात आहेत. २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. कॉलेज बहुतांश वेळी शिक्षणासाठी बंद राहिले.
प्रशिक्षणार्थी फायर फायटरला इमारतीवर चढणे, भूकंपासारख्या स्थितीत तिरप्या इमारतीवर बचावकार्य आणि गॅस प्लांटमध्ये स्फोटानंतर बचावकार्य आदी प्रात्यक्षिक करावे लागते; पण २०२०-२१ मध्ये असे प्रात्यक्षिक झालेच नाही. याशिवाय पम्पिंग प्रयोगही प्रशिक्षणार्थींकडून करून घेण्यात आले नाहीत. बीई फायर इंजिनिअरिंगचे सातवे आणि आठव्या सेमिस्टरची परीक्षा जून वा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.
याशिवाय सब ऑफिसर, स्टेशन ऑफिसर कोर्स आणि सबडिव्हिजन ऑफिसर कोर्सच्या प्रवेश परीक्षांचे आयोजनही करण्यात आले नाही. कोरोना संसर्गाचा परिणाम यावरही झाला आहे. आता या परीक्षा केव्हा होणार, यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. कॉलेजकरिता २०१९ मध्ये हिवाळ्यात नियमितरीत्या तीन प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांनंतर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागले आणि सर्व काही थांबले आहे.