नागपूर : कोरोना संक्रमणाचा मोठा परिणाम भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) च्या कामावर पडला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोणत्याही साइडवर उत्खनन करता आले नाही. आता नव्या २०२१-२२ या वित्तीय वर्षासाठीही खोदकामाचा कोणताही प्रस्ताव तयार झालेला नाही.
जीएसआय संभावित ठिकाणांवर खोदकाम करून हिरा, कोळसा, कॉपर आदी खनिजांचा शोध घेऊन तसा अहवाल तयार करते आणि सरकारला सादर करते. मात्र, मागील वर्षाच्या प्रारंभात झालेल्या कामांचे तांत्रिक विश्लेषण झाले नाही. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, अनलाॅक काळामध्ये वणी येथे आउटसाेर्स करण्यात आलेल्या एका कंपनीच्या माध्यमातून कोळशाचा शोध घेण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. यासोबतच छिंदवाडा जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कामही अपूर्ण आहे. मागील अनेक दिवसांपासून जीएसआय कार्यालयामध्ये शुकशुकाट आहे. मोजके अधिकारीच कामावर येत आहेत.