लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोंदिया व गडचिरोली वगळता पूर्व विदर्भातील इतर चारही जिल्ह्यांत सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. २२ जुलैपर्यंत सहाही जिल्हे मिळून सामान्याहून १०३ टक्के अधिक पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापैकी ४२ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.
पूर्व विदर्भाला संततधार पावसाने दिलासा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ६०९ मिमी पाऊस झाला व सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी १३९.३६ इतकी आहे. वर्धा (४२४ मिमी), नागपूर (३९०.२ मिमी) व भंडारा (४८८.२ मिमी) येथेदेखील सामान्याहून अधिक पाऊस नोंदला गेला. गोंदिया येथे सरासरीच्या ८२.४५ तर गडचिरोली येथे ८८.६१ टक्के पाऊस झाला.
पूर्व विदर्भात आतापर्यंत सरासरी ४४४.२ मिमी पाऊस झाला असून, सामान्याच्या तुलनेत हा आकडा १०३.११ टक्के इतका आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सहाही जिल्हे मिळून १०७२.५ मिमी पाऊस होतो. २२ जुलैपर्यंत त्यातील ४५८ मिमी पाऊस झाला असून याची टक्केवारी ४२.७ इतकी आहे. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत जून-सप्टेंबर या कालावधीतील ५६.१८ टक्के पाऊस झाला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत दमदार बरसला
मागील वर्षी २२ जुलैपर्यंत पूर्व विदर्भात ३९९.८ मिमी पाऊस झाला होता व सामान्याच्या तुलनेत ही टक्केवारी ९० इतकी होती. यंदा मागील वर्षीपेक्षा १३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
पूर्व विदर्भातील पर्जन्यमान (२२ जुलैपर्यंत मिमीमध्ये)
जिल्हा - सरासरी पाऊस - आतापर्यंत झालेला पाऊस - टक्केवारी
वर्धा - ३६८.३ - ४२४ - ११५.१२
नागपूर - ३८२.३ - ३९०.२ - १०२.०७
भंडारा - ४६०.८ - ४८८.२ - १०५.९५
गोंदिया - ४८७.२ - ४०१.७ - ८२.४५
चंद्रपूर - ४३७ - ६०९ - १३९.३६
गडचिरोली - ५१४.६ - ४५६ - ८८.६१
जून-सप्टेंबरमधील पर्जन्यमानाच्या तुलनेतील पाऊस
जिल्हा - टक्केवारी
वर्धा - ४८.४८ %
नागपूर - ४२.३९ %
भंडारा - ४२.२ %
भंडारा - ३२.९२ %
चंद्रपूर - ५६.१८ %
गडचिरोली - ३६.३६ %
सिंचन प्रकल्पांत ४३.९५ टक्के जलसाठा
२२ जुलैपर्यंत नागपूर विभागात ४३.९५ टक्के जलसाठा जमा झाला. मागील वर्षी हाच आकडा ५५.८२ टक्के इतका होता. मोठे सिंचन प्रकल्प भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. विभागात एकूण १८ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. ३५५३.६६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची त्यांची क्षमता आहे. सद्यस्थितीत १५६१.५१ दलघमी पाणी उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्यात तोतलाडोहमध्ये ५९.३९ टक्के, कामठी खैरी ६४.८० टक्के, रामटेक (खिंडसी) - ३०.०२ टक्के, लोअर नांद- ५५.९० टक्के व वडगाव सिंचन प्रकल्पात ५५.९० टक्के जलसाठा उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्यातील ठाणा लघुसिंचन प्रकल्प गुरुवारी १०० टक्के भरला. वरोरा येथील चंदई मध्यम प्रकल्प, नागभीड येथील चिंधी लघु प्रकल्पदेखील १०० टक्के भरले आहेत. चिमूरमधील गिरगाव व गडचिरोलीतील मामा तलावदेखील पूर्ण भरले आहेत.