आॅनलाईन लोकमतनागपूर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारी शीला ऊर्फ प्रमिला कोहाड अखेर गजाआड झाली. सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेत पोलिसांसोबत उठबस करणाऱ्या या महिलेचा बुरखा फाटल्यामुळे तिच्या संपर्कातील पोलिसांसकट अनेकांचे धाबे दणाणले आहे.शीला गेल्या १५ वर्षांपासून देहविक्रयाच्या गोरखधंद्यात सक्रिय होती. मध्यभारतात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारा कुख्यात सचिन सोनारकर, गोंदियाचा अमी चव्हाण, शीतल गदियासह ठिकठिकाणच्या दलालांच्या संपर्कात होती. शीला नागपूर-विदर्भातील ठिकठिकाणच्या आंबटशौकिनांना सेक्सवर्कर उपलब्ध करून देत होती. शहरातील विशिष्ट हॉटेल आणि फार्महाऊसमध्ये आयोजित पार्ट्यातही ती दिल्ली, मुंबई, लखनौसह ठिकठिकाणच्या वारांगणा उपलब्ध करून देत होती. या गोरखधंद्यात गुंतलेल्या शीलाने स्वत:च्या बचावासाठी चक्क पोलिसांचाच वापर चालविला होता. ती प्रतिस्पर्धी दलालांच्या आणि वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिलांच्या पॉश अड्ड्यांची माहिती देऊन पोलिसांचे छापे घालवून घेत होती. नंतर काही पोलिसांना त्या दलालांकडून मोठी रक्कमही मिळवून देत होती. त्यामुळे पोलीस तिच्यासोबत ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून वागत होते. शीलाचे नागपुरातील अनेक ठिकाणी कुंटणखाने होते. त्यापैकी बेसा येथील कुंटणखान्यावर दीड महिन्यापूर्वी पोलिसांनी छापा घातला. तेथे पकडल्या गेलेल्या वारांगनांनी शीला कोहाड ही पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांमध्येही खळबळ उडाली.अनेकांनी झटकले हातकुंटणखान्यावर छापा पडताच शीला फरार झाली. ती दीड महिना फरार होती. या दरम्यान तिने तिच्यासोबत संबंध असलेल्या पोलिसांसकट अनेकांशी संपर्क करून स्वत:ला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, साऱ्यांनीच हात झटकले. ती सुगतनगरातील सदनिकेत लपून असल्याची माहिती मंगळवारी हुडकेश्वर पोलिसांना मिळाली. पोलीस तिला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने माहिती देणाऱ्यांनी वरिष्ठांकडे ती माहिती पोहचविण्याचे संकेत दिले. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी धावपळ करीत तिला रात्री अटक केली.डायरी गुलदस्त्याततिच्या जवळून पोलिसांनी मोबाईल आणि मोठी डायरी जप्त केल्याचे समजते. या डायरीत आणि मोबाईलमध्ये ठिकठिकाणच्या वारांगना, दलाल अन् ग्राहकांसोबत काही पोलिसांचीही नावे आणि नंबर होते, असे सांगितले जाते. त्यामुळे पोलिसांनी त्याबाबत वाच्यता करण्याचे टाळून बुधवारी तिला कोर्टात हजर केले. कोर्टाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संबंधितांचा जीव भांड्यात पडला. वरिष्ठांनी त्या डायरी अन् मोबाईलमधील नावांची चौकशी केल्यास शहरातील अनेकांची बुरखे फाटू शकतात, असे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे.