खापरखेडा पोलिसांची शोधमोहिम : घटनास्थळी रक्त, केकमुळे संशयकोराडी : अज्ञात व्यक्तीने कोलार नदीवरील नांदा-कोराडी स्मशानभूमीलगतच्या पडित जमिनीत मृतदेह पुरला, ही माहिती सर्वत्र पसरताच परिसरात एकच खळबळ माजली. घटनास्थळ खापरखेडा पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांना माहिती देण्यात आली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. कोराडी पोलिसांची चमूही तेथे दाखल झाली. खापरखेड्याचे ठाणेदार दीपक वानखेडे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. दोन तासांच्या ‘सर्च’ आॅपरेशननंतर पुरण्यात आलेला मृतदेह पाळीव कुत्र्याचा असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.झाले असे की, शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी बापू बावनकुळे यांना त्यांच्या पडित जमिनीत कुणीतरी अज्ञात युवकांनी जमीन खोदून काहीतरी गाडले असल्याची माहिती दिली. सदर युवकांनी आपले चारचाकी वाहन महामार्गाच्या दिशेने आडवे उभे केले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. बापू बावनकुळे यांनी ही बाब गांभीर्याने घेत माजी सरपंच विठ्ठल निमोने यांच्यासह घटनास्थळी पाहणी केली. तेथे जमिनीत खड्डा करून काहीतरी पुरल्याचे दिसून आले. शिवाय, घटनास्थळावर रक्त पडले होते. बाजूला एक केक व त्यावर ‘मॅगी’ असे नाव लिहिले होते. तसेच बाजूला बिछाना (गोदडी) व उशी पडली होती.यावरून एखाद्या लहान मुलाचा खून करून मृतदेह पुरला असावा, अशी शंका बळावली. लागलीच पोलिसांनी कारवाई सुरू केली. घटनास्थळाचा पंचनामा, व्हिडीओ शुटिंग, फोटो सेशनही झाले. साक्षी-पुरावे गोळा करायला सुरुवात झाली. तोपर्यंत नांदा-कोराडीतील शेकडोंची गर्दी तेथे झाली. या गर्दीला सांभाळताना पोलिसांना कसरतच करावी लागली.मॉर्निंग वॉकदरम्यान कुणीही खून लपविण्याकरिता मृतदेह गाडण्याचे धाडस करणार नाही, शिवाय घटनास्थळी असलेल्या उशीवर कुत्र्याचे केस दिसत असल्याने कुणी तरी कुत्रा गाडला असावा, आदी विविध चर्चा नागरिकांत रंगत होती. पोलीस अधिकारी मात्र कुठलीही ‘रिस्क’ घेण्याच्या स्थितीत नव्हते. उशीवर रक्ताचे डाग असल्याने पोलिसांनी जमीन उखरून पाहणी करण्याचा निर्णय घेतला. अर्धा तास खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी पाळीव कुत्रा दफन केल्याचे आढळले. त्या कुत्र्याला पुन्हा दफन केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. (प्रतिनिधी)
मृतदेह पुरल्यावरून कोराडीत खळबळ
By admin | Published: January 03, 2016 3:42 AM