लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दसऱ्याला शुभमुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीचे वेगळेच महत्त्व असते. त्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला असून अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे तसेच दागिन्याचे बुकिंग केले आहे. दसऱ्याला नवीन वस्तू घरी नेण्याची अनेकांची तयारी आहे. या निमित्ताने बाजारात कोट्यवधींची उलाढालीचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोना महामारीची भीती कमी झाली असून लोक आता कुटुंबीयांसह घराबाहेर पडत आहे. मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीसाठी शोरूममध्ये जात आहेत. पुढे शाळा आणि कॉलेज सुरू होण्याच्या शक्यतेने अनेकांनी पाल्यासाठी दुचाकी खरेदीची तयारी सुरू केली आहे. मुलासाठी मोटरसायकल, मुलीसाठी स्कूटरेट आणि कुटुंबीयांसाठी कार खरेदीची योजना दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रत्यक्षात आणत आहेत. या निमित्ताने सर्वांनी शोरूमची सजावट केली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये शून्य टक्के डाऊन पेमेंट आणि फायनान्सवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीची संधी असल्याने अनेकांनी एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि अनेक उपकरणांचे बुकिंग केले आहे. या सर्व वस्तू दसऱ्याला घरी आणणार आहेत.
सराफा शोरूमची सजावट
दसऱ्याला सोने खरेदीची परंपरा असून बहुतांशजण किमान एक ग्रॅम सोने खरेदी करतोच. सोन्याचे दर ५१,५०० रुपयांदरम्यान स्थिर असल्याने आणि पुढे कमी होण्याची काहीही शक्यता नसल्याने अनेकांनी सोने खरेदीचा बेत आखला आहे. काहींनी दागिन्यांचे पूर्वीच ऑर्डर दिले आहेत. ते दसऱ्याला घरी नेणार आहे. याशिवाय चांदीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे.
शोरूमच्या संचालकांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतर दसरा सणाला ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. तो कॅश करण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे.गेल्या वर्षी दसरा आणि दिवाळी ऑक्टोबरमध्ये आल्याने त्या महिन्यात विक्री जास्त दिसून आली होती. पण यंदा अधिक मासामुळे यावर्षी दिवाळी नोव्हेंबरमध्ये आली आहे. दसऱ्याला खरेदीनंतर दिवाळीला मोठ्या वस्तू खरेदीची अनेकांनी तयारी केली आहे. याशिवाय केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बोनस घोषित केला आहे. त्यामुळे व्यापारी उत्साहात आहेत. कोरोना महामारीवर मात करून यंदाचा दसरा आणि दिवाळी व्यवसायासाठी फलदायी ठरणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.