नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालगाडीला रविवारी दुपारी १२ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान अग्निशमन विभागाने ही आग विझविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कोळशाने भरलेली डब्ल्यू. आर. ६१००३ ही मालगाडी ५८ वॅगन घेऊन उमरेडवरून तिरोडा काचवानी जवळील अदानी पॉवर या सायडींगवर चालली होती. ही मालगाडी दुपारी १२ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये उभी होती. दरम्यान या मालगाडीच्या मधोमध असलेल्या एका वॅगनमधून आरपीएफच्या एका महिलेस धूर निघताना दिसला. तिने लगेच याची सूचना उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. उपस्टेशन व्यवस्थापकांनी लगेच अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल वेळेवर पोहोचले. परंतु मालगाडीचा डबा मध्यभागी असल्यामुळे तो सुरुवातीला मालगाडीपासून वेगळा करावा लागला. त्यामुळे अग्निशमन विभागाला बराच वेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर वॅगनमधील आग विझविण्यात आली. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
..........