लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीला आता काहीच दिवस उरले आहेत. शहरातील सर्वच बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. विशेषत: नागपुरातील सर्वात जुन्या आणि होलसेल व रिटेल बाजार इतवारीत सध्या ग्राहकांची खरेदी वाढली आहे. येथील भांडे ओळ, सराफा बाजारासह किराणा ओळ, रेशीम ओळ आणि भंडारा रोडवरील बाजारात दिवाळी आणि लग्नाच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे.
शासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश लोकांना बोनस आणि वेतन मिळाल्याने खरेदीसाठी भांडे ओळ आणि सराफा बाजारासह इतवारीतील अन्य बाजाराकडे लोक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे व्यापारी उत्साहात आहेत. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. पण आता बाजारात गर्दी वाढल्याने नुकसान भरून निघण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. भांडे ओळीत दिवाळीसह लग्नसराईचे मिश्र ग्राहक आहेत. तर सराफा ओळीत ग्राहक एक ग्रॅमपासून जास्त वजनाचे दागिने खरेदी करीत आहेत. भांडे ओळीत तांबे, पितळ, स्टीलचे भांडे, पूजा थाळी, देवी-देवतांची कलात्मक प्रतिमेची जास्त मागणी आहे. रेशीम ओळ, भंडारा रोडवरील बाजारात रेडिमेड गारमेंटची मागणी वाढली आहे.
भांडे व्यवसायाला मिळाला ‘बूस्ट’
कोरोना महामारीमुळे चार महिन्यानंतर सध्या इतवारीतील भांडे ओळीत दिवाळी आणि लग्नाचे ग्राहक दिसत आहेत. त्यामुळे भांडे व्यवसायाला बूस्ट मिळाला आहे. कोरोना महामारीमुळे अनेक दिवसांपर्यंत खरेदी करू न शकलेले ग्राहक आता आवश्यक भांड्याच्या खरेदीसाठी बाजारात येत आहेत. व्यापारी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने विशेष दक्षता घेत आहेत.
- पुरुषोत्तम ठाकरे, अध्यक्ष, मेटल मर्चंट्स असोसिएशन
दागिन्यांची विचारणा वाढली
दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी व्यवसायात हळूहळू ग्राहकी वाढली आहे. एक ग्रॅमपासून जास्त वजनाचे दागिने आणि पूजेसंबंधित वस्तूंची मागणी वाढली आहे.
त्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे. कोरोना महामारीमुळे झालेली नुकसान भरपाई सध्या काही प्रमाणात भरून निघेल, अशी सराफांना अपेक्षा आहे.
- किशोर धाराशिवकर, अध्यक्ष, सोना-चांदी ओळ कमिटी.