लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी सहा जिल्ह्यांत मतदान झाले. ‘कोरोना’च्या सावटाखाली मतदान होत असले तरी मागील वेळेच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये अपेक्षेहून जास्त उत्साह पहायला मिळाला. सायंकाळी पाच वाजेअखेरीस नेमके किती मतदान झाले याची आकडेवारी आयोगाकडून आली नसली तरी ५५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, असा दावा प्रशासनाने केला आहे. मागील वेळेच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांहून जास्त मतदान झाले आहे.
सहाही जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. वातावरणात थंडावा असल्याने अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले. दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तींपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ३४.७० टक्के मतदान झाले होते. दुपारी २ वाजेपर्यंत ३२.९२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरदेखील अनेक मतदार मतदानासाठी घराबाहेर निघाले. सायंकाळी ४ वाजताअखेरीस हा आकडा ५३.६४ टक्क्यांवर गेला. यात ६०.९४ टक्के पुरुष व ४२.३६ टक्के महिलांचा समावेश होता. मतदानाची अंतिम टक्केवारी ५५ टक्क्यांहून अधिक आहे, असे इतकी होती. एकूण १९ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये बंद झाले असून गुरुवारी निकाल समोर येणार आहे.
‘व्हीआयपी’ मतदारांचे मतदान
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.
सर्वाधिक उत्साह भंडारा जिल्ह्यात
दुपारी चार वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदार संघामधील सहाही जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त ५७.७७ टक्के मतदान भंडारा जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल वर्धा येथे ५७.७९ टक्के मतदान झाले. नागपूर पदवीधर मतदारसंघ सहा जिल्ह्यांत असून उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचता पोहोचता दमछाक झाली होती. मात्र यंदा ग्रामीण भागातदेखील मतदानासाठी बराच उत्साह दिसून आला.
सोशल मीडियावर सबकुछ ‘व्होटिंग’
प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत ‘फोटोसेशन’लादेखील ऊत आला होता अन् लगेच ‘सोशल मीडिया’वर ‘शेअर’ करणेदेखील सुरू होते. ‘मी मतदान केले’, ‘प्लीज, डू व्होट’ अशा पद्धतीच्या ‘मेसेज’ची देवाणघेवाण सुरू होती.
‘वेबकास्टिंग’द्वारे केंद्रावर ‘वॉच’
भारत निवडणूक आयोगाने ‘वेबकास्टिंग’ यंत्रणेचा वापर सक्तीचा केला आहे. त्यामुळे पदवीधरच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व सहाही जिल्ह्यांधील मतदार केंद्रांची ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष छायाचित्र उपलब्ध होत होते. पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनीदेखील जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागाची माहिती जाणून घेतली.
जिल्हानिहाय टक्केवारी (दुपारी चार वाजेपर्यंत)
जिल्हा - टक्केवारी
नागपूर - ५३.९१
भंडारा - ५७.७७
चंद्रपूर - ५४.१६
गोंदिया - ५०.८०
गडचिरोली - ४०.५४
वर्धा - ५७.५९
मतदानाच्या टक्केवारीचा पल्ला
वेळ - टक्केवारी
सकाळी १० वाजता - ८.१६ %
दुपारी १२ वाजता - १९.७० %
दुपारी २ वाजता - ३२.९२ %
दुपारी ४ वाजता - ५३.६४ %