आशिष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा हरवला आहे; परंतु विद्यापीठाने या प्रकरणाची अद्याप चौकशी केली नाही. उलट संबंधित महाविद्यालयांना नव्याने डेटा अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी डेटा अपलोड करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आधी ही मुदत २ डिसेंबरपर्यंतच होती. डेटा हरवलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा नोंदणी क्रमांक मिळणार नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भविष्य संकटात सापडू शकते.
विद्यापीठाने महाविद्यालयांना नव्याने डेटा अपलोड करण्याचे कारण सांगितले नाही. महाविद्यालये यावर नाराज आहेत. डेटा आधीच अपलोड केला आहे. पुन्हा तीच किचकट प्रक्रिया करणे अशक्य आहे. अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचारी संपावर आहेत, तर खासगी महाविद्यालयांतील कर्मचारी प्रवेश प्रक्रियेत व्यस्त आहेत, असे महाविद्यालयांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांची अडचण समजून घेण्यास नकार दिला आहे. डेटा अपलोड करणे बंधनकारक असल्याचे महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महाविद्यालयांना केवळ नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा डेटा मागण्यात आल्याची माहिती दिली. असे आहे तर, सर्व महाविद्यालयांना नोटीस का पाठविली जात आहे, असा प्रश्न महाविद्यालयांनी उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे व कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणामागील सत्य परिस्थिती स्पष्ट होऊ शकली नाही.