नागपूर : थॅलेसेमिया या गंभीर रक्ताच्या आजाराशी तोंड देत असताना तीन वर्षांच्या चिमुकलीला कुठल्यातरी ‘ब्लड बँके ’तून मिळालेल्या रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे पुढे आले आहे. याची गंभीर दखल सरकारने घेण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
नागूपर जिल्ह्यात थॅलेसेमियाचे ६०० ते ६५० रुग्ण आहेत. थॅलेसेमिया हा रक्ताचा एक आनुवांशिक आजार. या आजाराच्या रुग्णांमध्ये सामान्यांच्या तुलनेत लाल रक्तपेशींची संख्या कमी असते. कमी हिमोग्लोबीन आणि फार कमी लाल रक्त पेशींमुळे रुग्णाला खूप जास्त थकवा येतो. या लाल रक्तपेशी फार गतीने नष्टही होतात. यामुळे दर १५ दिवसांनी रुग्णाला रक्त द्यावे लागते. सरकारकडून थॅलेसेमिया व सिकलसेलग्रस्तांना खासगी व शासकीय रक्तपेढीतून मोफत रक्त देण्याचा नियम आहे. परंतु हे रक्त ‘नॅट टेस्टेड’ नसल्याने थॅलेसेमिया व सिकलसेलग्रस्तांना ‘एचआयव्ही’ व ‘हेपॅटायटीस सी’ व ‘बी’ चा धोका निर्माण झाला आहे.
-एचआयव्हीचे आठ महिन्यांपूर्वी निदान
तीन वर्षांच्या चिमुकलीच्या आईने एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, एका ब्लड बँकेतून मुलीला रक्त दिले. त्यातूनच आठ महिन्यांपूर्वी मुलीला ‘एचआयव्ही’ झाल्याचे निदान झाले. आधीच थॅलेसेमियाचा गंभीर आजार, त्यात ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याने जीवाला धोका आणखी वाढला आहे.
-शासकीय रुग्णालयातून अर्धवट उपचार
‘एचआयव्ही’वर शासकीय रुग्णालयातून उपचार केले जात असलेतरी अर्ध्या औषधी बाहेरून विकत घ्यावी लागतात. गरीब रुग्णांना ही महागडी औषधी परडवत नाही. सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणीही चिमुकलीच्या आईने केली.
-चार मुलांना रक्तातून एचआयव्हीची लागण
मुलाखतीत एका पालकाने सांगितले, नागपुरातीलच थॅलेसेमिया व सिकलग्रस्त चार मुलांना रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे सामोर आले आहे. यातील एकाचा मृत्यू झाला. दूषित रक्त दिल्याने ‘हेपॅटायटीस सी’ची पाच जणांना तर, ‘हेपॅटायटीस बी’ची दोन मुलांना लागण झाली. ही सर्व मुले १० वर्षांच्या खालची आहेत.
-सरकारने याची जबाबदारी घ्यावी
थॅलेसेमिया व सिकलसेलग्रस्तांना शासकीयसह खासगी रक्त पेढीतून मोफत रक्त दिले जाते. परंतु या रक्ताची ‘न्युक्लीक ॲसिड टेस्टींग’ होत नाही. यामुळे ‘एचआयव्ही’, ‘हेपॅटायटीस सी’ व ‘बी’ होण्याची भीती असते. हा धोका टाळण्यासाठी या दोन्ही आजाराच्या रुग्णांना ‘नॅट टेस्टेड’ मोफत रक्त उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
-डॉ. विंकी रुघवानी, अध्यक्ष थॅलेसेमिया व सिकलसेल सोयसायटी ऑफ इंडिया