निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडेच माळढोक आणि तनमोर या अतिशय संवेदनशील व संकटग्रस्त प्रजातीत माेडल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे अस्तित्व नागपूर जिल्ह्यात आढळले आहे. असे असताना या पक्ष्यांच्या संवर्धन आराखड्यात नागपूरचा समावेश नसल्याने पक्षी अभ्यासकांमध्ये नाराजी आहे. आराखड्यात समावेश झाला तर जिल्ह्यात या संकटग्रस्त पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कार्य होईल, असा विश्वास व्यक्त करीत समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी व्हीसीए मैदानाजवळच्या परिसरात तनमाेर हा पक्षी दिसला हाेता. आश्चर्य म्हणजे यावर्षी नुकतेच उमरेड राेडवर दिघाेरीजवळ माळढाेक पक्ष्याचेही दर्शन घडले. हे दाेन्ही पक्षी अतिसंकटग्रस्त गटात माेडतात. त्यामुळे पक्षीप्रेमी व अभ्यासकांसाठी ही सुखावणारी बाब ठरली. संवेदनशील गटात असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न हाेणे गरजेचे आहे. शासन स्तरावर यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. राज्यात माळढाेक संवर्धनाच्या कृती आराखड्यात यापूर्वी साेलापूरचे नानज आणि विदर्भातील नागपूर व वराेरा यांचा समावेश हाेता. मात्र काही वर्षात पक्ष्याचे अस्तित्व न आढळल्याने नागपूरला यातून वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आराखड्यात समावेश नसल्याने संवर्धनासाठी उपाययाेजना कशा हाेतील, ही शंका पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
संवर्धन आराखड्यात स्थान नसले तर वन विभागाकडून त्या प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न हाेत नाही, असा अनुभव आहे. माळढाेक व तनमाेर संवर्धनात नागपूरचा समावेश झाल्यास निधी प्राप्त हाेईल. त्यांच्या अधिवासासाठी आवश्यक ग्रासलॅंड तयार हाेईल आणि याेजना आखली जाईल.
काय आहे निकष?
संबंधित पक्ष्याचा अधिवास नसेल किंवा आता आढळत नसेल किंवा संवर्धन करण्यासाठी निधी उपलब्ध नसेल किंवा शासनाला वाटत असेल की त्या जीवाच्या संवर्धनासाठी या भागात प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही किंवा शासनाने नेमलेल्या अभ्यासगटाला तसे वाटत नसेल तर एखादा भाग आराखड्यातून वगळला जाऊ शकताे.
१० वर्षापूर्वी माळढाेक व तनमाेर पक्ष्याचे नागपूर जिल्ह्यात अस्तित्व हाेते. इतक्या वर्षाने आता पुन्हा हे दाेन्ही पक्षी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धन आराखड्यात नागपूरचा समावेश करावा, अशी पक्षी अभ्यासकांची भावना आहे.
अविनाश लाेंढे, पक्षी अभ्यासक