जैन संत आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वर महाराजांचा उपदेश : श्वेतांबर जैन समाजात तपसाधनेच्या पवित्र पर्युषण पर्वाला प्रारंभ नागपूर : तप आणि साधनेचे महापर्व पर्वाधिराज पर्युषणाला प्रारंभ झाला आहे. हे पर्व १८ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. या दरम्यान श्वेतांबर जैन समाजात तप, साधना, स्वाध्याय आदि विविध धार्मिक गतिविधी होणार आहेत. श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर वर्धमाननगर येथे जैनसंत आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वरजी विराजमान आहेत. याप्रसंगी आचार्य भाविकांना संबोधित करीत होते. महाराज म्हणाले, पर्युषण पर्वात पाच कर्म अवश्य करायला हवे. केवळ धर्मवाणी ऐकून काम होत नाही. धर्माला आचरणातही आणले गेले पाहिजे. यात प्रथम कर्तव्य अहिंसेचा प्रचार करणे आहे. हिंसेचा विरोध आणि बहिष्कार करायला हवा. अहिंसा भारतीय नागरिकांची माता आहे. अहिंसा दैवी तत्त्व आहे. हिंसा आसुरी तत्त्व आहे. आचार्य म्हणाले, आपण सारेच अहिंसामय धर्मात मोठे झालो आहोत. आपला जन्म ज्या देशात झाला त्या भारताच्या रोमारोमात अहिंसाच भरली आहे. अहिंसेचा संस्कार ज्या देशात आमच्यावर झाला त्या देशात किती मोठ्या प्रमाणत हिंसा होते आहे. अहिंसेचा अर्थ भित्रेपणा नाही. पण भारतीय नागरिकांच्या उदासीनतेमुळे देशात मोठ्या प्रमाणात हिंसा होते आहे. श्री वर्धमाननगर जैन श्वेतांबर श्रावक संघाचे अध्यक्ष गणेश जैन, महामंत्री अनिल कोचर आणि चातुर्मास समितीचे संयोजक राजेश मेहता यांनी जीवदया फंड, एकासना आंगी, प्रभावना व सधार्मिक निधीसाठी सहाकार्य करण्याचे निवेदन यावेळी दिले. (प्रतिनिधी)
अहिंसेचा प्रचार आणि हिंसेचा बहिष्कार करा
By admin | Published: September 11, 2015 3:41 AM