लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकीत असणाऱ्या स्थावर मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. यात जप्त करण्यात आलेल्या २७ मालमत्तांचा ९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्यापूर्वी मालमत्ताधारकाना थकबाकी भरण्याची शेवटची संधी उपलब्ध आहे.
थकबाकीदारांच्या ६४ मालमत्ता जप्त केल्या होत्या. यातील काही मालमत्ताचा काही दिवसापूर्वी लिलाव करण्यात आला. यातील शिल्लक मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.
मनपाचा आर्थिक स्रोत मालमत्ता कर आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी वाढली आहे. अनेक. मालमत्ताधारक कर भरत नसल्याने मनपाने लिलाव मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांला आधी दोनदा नोटीस दिल्यावरही कर जमा न केल्यास संबंधित मालमत्तावर जप्ती कारवाई करण्यात येते. त्यानंतर जप्त केलेल्या या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. गेल्या महिन्यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रतापनगर परिसरातलील एका डुप्लेक्स बंगल्याचा ५७ लाखांत लिलाव करण्यात आला. या मालमत्तेवर ६४ हजारांची अनेक वर्षांपासूनची थकबाकी होती. नोटीस पाठविल्यावरही मालमत्ताधारकाने प्रतिसाद दिला नाही. तसेच हनुमाननगर झोनमध्ये मालमत्ताधारकाने मालत्तेचे म्युटेशन न केल्याने मालत्ताप्रकरणी जुन्या ले-आऊट धारकास नोटीस पाठविली गेली. ती नाकारण्यात आल्यानंतर मनपातर्फे मालमतेबाबत सूचना प्रसिद्ध केली. मात्र, त्यानंतरही कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्या मालमत्तेचाही लिलाव करण्यात आला. आता या मालमत्ताधारकाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु मनपाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर लिलाव प्रक्रिया केली.