महेश्वरी प्रसाद : ‘भारत मे समय की संकल्पना’ यावर व्याख्याननागपूर : काळाच्या प्रेरणेमुळे सूर्य या सृष्टीला प्रकाशमान करीत असून काळामुळेच या सृष्टीचे अस्तित्व आहे, असे प्रतिपादन प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ. महेश्वरी प्रसाद यांनी आज येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती व्याख्यानमालेत ‘भारत मे समय की संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम उपस्थित होते. डॉ. महेश्वरी प्रसाद म्हणाले, काळामुळेच जमिनीची निर्मिती होऊन त्यावर प्राणिमात्रांना आश्रय घेण्यास जागा मिळाली. काळामुळेच सर्व जग सुखी होते. काळच ईश्वर, प्रजा यांचा पालक आहे. काळामुळेच तपशक्ती, दिशांची निर्मिती झाली. काळामुळे वायु प्रवाहित होऊन पृथ्वीला गती मिळते. ब्रह्म या संकल्पनेचा विस्तार झाल्यामुळे उपनिषदांमध्ये काळाची स्थिती गौण झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु वेदांताचे काही संप्रदाय काळाला ईश्वराची शक्ती म्हणून स्वीकार करतात. काळामुळे प्राणी जन्म घेतात, मोठे होतात आणि त्यांचा अस्तही होतो. काळाचे ज्ञान प्रत्यक्ष नाही, परंतु अंदाजाने घेता येते. जैनदर्शनही काळाची वास्तविक सत्ता मान्य करतो. या दर्शनानुसार काळाचे सहा द्रव्य आहेत. त्यात जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काळ यांचा समावेश आहे. पतंजली यांनी ज्यामुळे मूर्त पदार्थांची वृद्धी, ऱ्हास होताना दिसतो तो काळ अशी व्याख्या केली असल्याचे त्यांनी सांगितले. भागवतातही काळामुळेच प्राण्यांची निर्मिती आणि संहार होत असल्याचे मान्य करण्यात आल्याचे ते म्हणाले. विज्ञानाने आधुनिक काळात केलेल्या प्रगतीचे योग्य विश्लेषण आवश्यक असून या विश्लेषणाला काळाच्या कसोटीवर तपासून पाहता आले तर ही आमची मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी काळ सर्व समावेशक असून गेलेला काळ परत मिळविणे शक्य नसल्याचे सांगितले. संचालन प्रीती त्रिवेदी यांनी केले. आभार कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)
काळामुळेच आहे सृष्टीचे अस्तित्व
By admin | Published: September 11, 2015 3:37 AM