लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात उद्या शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच व्यवहार बंद राहतील. प्रशासनाने लॉकडाऊन लावलेला नाही. हा स्वयंस्फुर्त असेल. नागरिकांनी स्वत:च ही जबाबदारी घ्यायची आहे. काही काम नसेल तर घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा. असे पाालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यासंदर्भात शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे ही उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले,
नागपुरात कोरोनाची संख्या वाढत आहे. परंतु अजुनही नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही. त्यामुळेच मी जबाबदार मोहीम सुरु केली आहे. या विषयातील जे तज्ज्ञ आहेत, त्यांचे म्हणणे आहे की, या परिस्थितीत कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोणतेही लक्षण दिसले तर कोविड टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शनिवार-रविवारी बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. वाचनालये सुद्धा ७ मार्च पर्यंत बंद आहेत. शाळा महाविद्यालये, कोचिंग क्लासेसद्वारेही शनिवारी- रविवारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. गार्डन, वाकींग प्लाजा, पेट्रोल पंप, जीम, भाजीपाला , फळे, न्यूज पेपर सुरु राहील. शासकीय कार्यालयासह खासगी कार्यालये व सर्व बाजार बंद राहील.
चाचण्या तीन पटीने वाढल्या, व्हॅक्सिनेशनसाठी पुन्हा ५ हजार नवीन नोंदणी
नागपुरात कोरोनाच्या चाचणी तीन पटीने वाढवल्या आहेत. मुंबईत दररोज ११ हजार टेस्ट होत आहेत. तर नागपुरात दहा हजारावर चाचण्या होत आहेत. सुपर स्प्रेडरच्या चाचण्या सुद्धा होत आहे. व्हॅक्सिनेशन सुद्धा होत आहे. ५ हजार नोंदणी पुन्हा नव्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोना बेडची संख्या पुरेशी, क्वारंटाईन सेंटरची सध्या आवश्यकता नाही
कोरोनाचे रुग्णांसाठी नागपुरात पुरेशे बेड उपलब्ध आहेत. सध्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड १७६९ आहेत. आयसीयूचे बेड ६८४ व वेंटीलेटरचे बेड २६३ आहेत.
होम क्वारंटाईन असलेल्यांच्या हातांना शिक्के मारले जात आहे. ज्यांना रुग्णालयात भरती व्हायचे आहेत. ते भरती होऊ शकतात. सध्या क्वारंटाईन सेंटरची गरज नाही, असे पाालकमंत्री राऊत यंनी स्पष्ट केले.
नागपुरात नवीन स्टेन नाही
कोरोनाची संख्या वाढत असली तरी नागपुरात सध्या तरी कोरोनाचा नवीन स्टेन नाही, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.