नागपूर : अजनी रेल्वे स्थानकाचा विकास व विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असून त्यादिशेने कामदेखील सुरू झाले आहे. याच स्थानकाच्या धर्तीवर इतवारी रेल्वे स्थानकाचादेखील विस्तार व्हावा अशी मागणी आ.कृष्णा खोपडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्रदेखील पाठविले आहे.
नागपूर शहराच्या पूर्व भागात इतवारी, कळमना व भांडेवाडी इत्यादी फार जुनी रेल्वे स्टेशन असून इतवारी रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे ५०० एकर जागा उपलब्ध आहेत. तेथे अगोदरपासून मालधक्के आहेत. परंतु सद्यस्थितीत या मालधक्यांचा फारसा उपयोग नाही. या ठिकाणी मुबलक प्रमाणात रेल्वेची जागा उपलब्ध असल्यामुळे मोठे रेल्वे स्टेशन साकार होऊ शकते. या भागात व्यापारपेठ व उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असून व्यापारी वर्गासोबतच इतवारी, महाल या क्षेत्रातील नागरिकांना याचा निश्चित फायदा होईल. त्यामुळे अजनी रेल्वे स्टेशन विकास योजनेच्या धर्तीवर इतवारी रेल्वे स्टेशनचा विस्तार व कायापालट करावा. गडकरी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे.