लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेश टेकडी उड्डाणपुलामुळे रेल्वे स्टेशनचा विस्तार खोळंबला आहे. दुकानदारांना मोबदला देण्यासाठी महापालिकेला २० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. त्याशिवाय प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करता येणार नाही.
स्टेशनच्या विस्तारासाठी आज जागा नाही. योग्य पद्धतीने विस्तार करून, या परिसराचे सौंदर्य अधिक वाढविण्यासाठी टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करून, त्यांना दुकानांच्या बदल्यात जागा किंवा पैसे हवे असल्यास त्याचा मोबदला मनपाला द्यावा लागणार आहे. यासाठी २० कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे.
सध्या या उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानदारांशी मनपाने ३० वर्षांचा लीज करार केला आहे. यापैकी १२ वर्षे निघून गेली आहेत. या दुकानदारांना हटविण्यासाठी व्याजासह २० कोटींचा मोबदला द्यावा लागणार आहे.
टेकडी उड्डाणपुलामुळे रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीची कोंडी होते. दुसरीकडे रेल्वे स्टेशन परिसराचा विकासही थांबला आहे. सीताबर्डी रेल्वे स्टेशन लगतची जागा, मध्य प्रदेश परिवहनची जागा, संरक्षण मंत्रालयाची जागा प्राप्त करून, सहा पदरी रस्ता व प्लाझाचे बांधकाम केले जाणार आहे. सोबतच या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
....
२०० दुकाने मनपाला मिळणार
मनपा, महामेट्रो, सार्वजनिक बांधकाम व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करून सीताबर्डी रेल्वे स्टेशनजवळ उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित प्लाझामधील २०० दुकाने मनपाच्या मालकीची राहणार आहे. या दुकानातून मनपाला ३३ कोटी मिळण्याची आशा आहे.
...
उड्डाणपुलाखाली १७५ दुकाने
टेकडी उड्डाणपुलाखाली १७५ दुकाने आहेत. यातील १५ दुकाने खाली आहेत. उड्डाणपुलाचे बांधकामावर मनपाने १६.२३ कोटींचा खर्च केला आहे. यासाठी दुकानदारांना दुकाने ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आली होती. यातून हा निधी उभारण्यात आला होता.