लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तणाव, विवंचनेत मनाला तजेला देण्याचे सामर्थ्य सांस्कृतिक क्षेत्रात आहे. या क्षेत्राच्या विकासावरूनच समाजाच्या प्रगल्भतेची जाणीव होते, असे म्हटले जाते ते याचमुळे. मात्र, म्हणावा तसा विकास नागपूरच्या सांस्कृतिक क्षेत्राचा झालेला दिसत नाही. कलावंत आणि रसिक यांच्यातील दरी अजूनही कायम आहे. तंत्रज्ञानाच्या वावटळीत अनेक कलावंत पारंपरिक कला जोपासून आहेत. मात्र, रसिकांच्या उदासीनतेमुळे पारंपरिक कला आणि कलावंत अजूनही उपेक्षित आहेत. त्याला शासन आणि प्रशासनाचे धोरणेही कारणीभूत आहेत. त्याअनुषंगाने कला, कलावंत, रसिक, शासन-प्रशासन यांच्यात समन्वयाची अपेक्षा नव्या वर्षात आहे.
पुरातत्त्व, ऐतिहासिक वास्तूंना संरक्षण
स्मार्टसिटीची अपेक्षा सर्वांनाच असली तरी जुन्या वारसांची जाणीवही महत्त्वाचे आहे. भूतकाळात जगून चालणार नाही, हे खरे असले तरी आपला भूतकाळ काय त्याची जाण ठेवून वर्तमानात भविष्यवेधी वाटचाल करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात. मात्र, शहरातील अनेक पुरातत्त्व विषय आणि ऐतिहासिक वास्तूंकडे शासन-प्रशासन स्तरावरून दुर्लक्ष केले गेले आहे. नव्या पिढीला या विषयांकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न नव्या वर्षात होणे अपेक्षित आहे.
नाट्यगृहांची उणीव भरून निघावी
शहरात देशपांडे, भट, सायंटिफिक, साई सभागृह आहेत. मात्र, नाट्यगृह म्हणून त्यांच्याकडे बघितले जात नाही. वास्तवात नाट्यगृह म्हणावी अशी एकही वास्तू शहरात नाही. लहान नाट्यगृह व ओपन थिएटर्सची मागणी सर्वश्रुत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे त्याकडे कानाडोळा झाला आहे. प्रत्येक बागांमध्ये ओपन थिएटर्सची रचना व्हावी, अशी अपेक्षा नव्या वर्षात आहे.
..........