लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्र व गुजरातला फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला व मदत घोषित केली. मात्र त्यांनी हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की महाराष्ट्रात वादळाचा फटका बसलेल्यांनादेखील नुकसानभरपाईची आवश्यकता आहे. गुजरातला केंद्र शासनाकडून मिळत असलेल्या मदतीबाबत काहीच तक्रार नाही. परंतु महाराष्ट्रालादेखील मदत मिळाली पाहिजे, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेथून ते कारंजालाडकडे रवाना झाले.
सर्व भागांमध्ये ॲलर्ट जारी झाल्यानंतरदेखील चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधानांनी गुजरातला हजार कोटींचा मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्रासाठी अद्यापपर्यंत कुठलीही घोषणा झालेली नाही. केंद्र शासन आवश्यक मदत करेल, अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन दिलीप वळसे पाटील यांनी केले. बार्ज पी ३०५ची झालेली घटना व त्यात झालेले मृत्यू ही बाब अतिशय अशोभनीय आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. मुंबईत पंतप्रधानांविरोधात लागलेल्या पोस्टर्सबाबत विचारणा झाली असता संबंधित मुद्दा पोलीस आयुक्त पातळीचा असल्याचे म्हणत त्यांनी बोलण्यास नकार दिला.
मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय होईल
मराठा आरक्षण प्रकरणाबाबत योग्य कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अभ्यासासाठी समिती गठीत केली आहे. समितीच्या अहवालानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्य शासन जनतेच्या अपेक्षांप्रमाणेच काम करत आहे. पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या प्रकरणावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.