नागेश चौधरी : एस.सी. एस. व्याख्यानमाला नागपूर : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर परस्परविरोधी चर्चांना उत आला आहे. मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी असल्याचे मानले जात आहे. त्यात तथ्यही आहे पण तरीही मोदींकडून अपेक्षा आहेत कारण मोदींना ते ज्या पदावर आहेत, त्याची जाणीव आहे. पण मोदींनी केलेल्या घोषणा अद्यापही खऱ्या होताना दिसत नाही कारण मोदीना त्यांचे मंत्रीमंडळच सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे मोदी एकटे पडले आहेत. त्यामुळे मोदींकडून अपेक्षा आहेत पण त्यावर काळ हेच उत्तर असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागेश चौधरी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित एस. सी. एस. व्याख्यानमालेत नागेश चौधरी बोलत होते. ‘केंद्रातील सत्ता आणि आव्हाने’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ताराचंद्र खांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून रणजित मेश्राम, डॉ. भाऊ लोखंडे, विजय चिकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागेश चौधरी म्हणाले मोदींमुळे सारेच बदलणार असे नाही पण अपेक्षांना वाव आहे. मोदी संघाच्या वातावरणातून आले असले तरी त्यांना संविधानाचा आदर असल्याचे जाणविते. हीच मोठी गोष्ट आहे. मोदींना गोध्रा कांडासाठी दोषी ठरविण्यात येते पण शरद पवार असताना महाराष्ट्रातही असेच घडले. मुझफ्फर नगरच्या हत्याकांडाबाबतही कुणाला दोषी ठरविले जात नाही. प्रत्यक्षात मोदींना जो विरोध होतो आहे तो त्यांच्या पक्ष आणि रा. स्व. संघामुळे होतो आहे. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की, मोदींनी संघाचा अंकुश मानलेला नाही. ते संघ म्हणेल तसे वागत नाहीत. त्यांनी संघाच्या विरोधातही वक्तव्य केले असून संघही त्यांच्या विरोधात बोलत असतो. मोदींना बहुजनांची जाण आहे पण काही वेळेला त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूकीचे वाटते. देशाचा विकास हा त्यांचा मुद्दा पटणारा आहे. प्रत्येकचवेळी भांडवलवाद शोषण करणारा नसतो. भांडवलशाहीचा विकास झाला तर सामान्य माणसाचे जगणे उन्नत होते, हा इतिहास आहे. युरोप आणि अमेरिका त्याची उदाहरणेही आहेत. या भांडवलशाहिचा विकास करण्याचे स्वप्न मोदी पहात आहेत पण प्रशासन आणि त्यांचे मंत्रिमंडळ त्यांना सहकार्य करीत नाहीत, अशी स्थिती आहे. अशावेळी काळ हेच उत्तर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
मोदींकडून अपेक्षा, पण काळ हेच उत्तर
By admin | Published: December 17, 2014 12:26 AM