नागपूर : काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू ऊर्फ उदयसिंग यादव यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी लोधी समाजाच्या विविध संघटनांनी केली आहे. गज्जू यादव यांच्यावर जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. सव्वालाखे हे लोधी समाजाचे असल्याने गज्जू यादव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी समाजाच्या संघटनांनी काँग्रेस पक्षाकडे केली आहे.
लोधी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन मागणी केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी पारशिवनी येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेसच्या नेत्यांपुढे दुधाराम सव्वालाखे व गज्जू यादव यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून यादव यांच्या कार्यकर्त्यांनी सव्वालाखे यांना मारहाण केली. यात सव्वालाखे जखमी झाले असून, ते उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही झाली आहे. लोधी समाजाने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. या पत्रपरिषदेला लोधी समाज बहुउद्देशीय विकास संस्थेचे अनंतलाल दमाहे, डॉ. जगन्नाथ मुरोडीया, रतनलाल कुमेरिया, रमेश बिरनवार, इंजि. राजीव ठकरले, पांडुरंग मुरकुटे, राधेश्याम नागपुरे, तानसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.